Thursday 12 July 2018

माकुल चिली


साहित्य :

नळ (पाईप्) माखुल
आल, लसुण, पेस्ट १ चमचा
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
१ ते दोन चमचे मसाला किंवा अर्धा चमचा मिरची पुड
२-३ पाकळ्या ठेचलेला लसुण
१ मोठा कांदा चिरुन
१ सिमला मिरची कापून तुकडे करून
थोडी चिरलेली कोथिंबीर
थोडिशी चिंच
चविनुसार मिठ
२ चमचे तेल.

माकुल साफ करणे म्हणजे थोडे कठीणच काम असते. माखली दोन प्रकारच्या असतात नळ माखली आणि सर्‍या किंवा मणेर माखली. ही आहे नळ माखली. हिच्या वरती पातळशी साल असते ती काढून टाकायची म्हणजे लवकर शिजण्यास मदत होते. ही साल काढल्यावर अगदी शहाळ्यासारखी माखले दिसु लागतात. 

ह्याचे डोके आणि शरीर हाताने सहज वेगळे होते. ते वेगळे करुन घ्यायचे. मग त्याच्या डोक्याच्या भागाला चिकटून काळसर भाग येतो तो काढुन टाकायचा आणि बाकीचा डोक्याचा चांगला भाग, शेपट्या आणि मांसल भाग घ्यायचा.  ( हे काम शक्यतो कोळणीवरच सोपवायचे) खालच्य रेसिपी साठी आपल्याला फक्त रींग्ज घ्यायाच्य आहेत.  

नळ  माखल्या साफ करुन त्या गोल कापा. त्या आधीच पाईपप्रमाणे असल्यामुळे गोल कापयला जास्त कलाकुसर करावी लागत नाहीत. म्हणजे व्हेज मधल्या पडवळासारखे.

पाककृती :

१. नळ माखळीच्या थोड्या रिंग्ज धुवून त्याला आल-लसुण पेस्ट लावून वेळ असल्यास थोडे मुरवुन किंवा डायरेक्ट कुकरला १० ते १५ मिनीटे शिजवून घ्या.

२. एका भांड्यात तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजवा.

३. आता त्यात हिंग, हळद, मसाला हे जिन्नस घालून थोडे परतवा आणि लगेच त्यात शिजलेल्या माकुळच्या रिंग्ज आणि सिमला मिरची घालून, मिठ घालून चांगले परतवा.


४. लगेच थोडा चिंचेचा कोळ घाला आणि त्यावर कोथिंबीर घालून परतवा. २-३ मिनीटे परतवून लगेच गॅस बंद करा.



ही डिश स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता व मेन कोर्स म्हणूनही घेऊ शकता.

टिपा:

चिंचे ऐवजी लिंबू वापरू शकता.
आवडत असल्यास थोडा गरम मसाला वापरू शकता.

No comments: