Friday 14 December 2018

इडली चिली



बर्‍याचदा आपल्या घरी केलेल्या ईडल्या उरतात. सारख्या त्याच खायला कंटाळा येतो (सगळ्यांनाच येतो असे नाही) म्हणून थोड्या वेगळेपणाने त्यांना संपविण्याचा एक चायनीज मार्ग.

इडलीचे तुकडे कापून
कांदा जरा जाडाच कापून घ्या
सिमला मिरचीचे तुकडे
आल-लसूण बारीक कापून



रेड चिली सॉस
ग्रिन चिली सॉस
टोमॅटो सॉस
सोया सॉस


चवीपुरते मिठ
तेल

कृती :
इडलीचे तुकडे तेलातून तळून घ्या. छान कुरकुरीत होतात.


मोठ्या कढईत किंवा खोलगट तव्यामध्ये तेल गरम करायचे. गॅस मोठा ठेउन त्यावर चिरलेले आल-लसूण टाकून थोड परतून लगेच कांदा टाकायचा.



परतून सिमला मिरची टाका.


आता ती थोडी परतून त्यात थोडे थोडे चारही सॉस टाका.


मोठ्या गॅसवर भराभर परतवून त्यावर इडली तुकडे घाला व चांगले एकजीव होईपर्यंत परतवा. वरून थोडेसे मिठ घाला. गॅस बंद करा. झाली इडली चिली.


टिपा :
जास्त तेलाचा वापर टाळायचा असेल तर इडलीचे तुकडे फ्राय न करताच टाका.
ह्यात अजून कोबी, कांद्याची पात व तुमच्या आयडीया नुसार भाज्या घालू शकता.

Friday 7 December 2018

पनिर फ्रँकी



मुलच काय पण मोठेही रोज तेच तेच चपाती आणि भात खाऊन कंटाळतात. आहो करणार्‍यालाही रोज रोज तेच करायचा कंटाळा येतच असतो पण नाईलाज असतो बरेचदा. कारण नविन पदार्थ करायचा म्हटल की सामानाची जुळवा जुळव, तयारी करावी लागते. मग इच्छा असून पण सामान किंवा वेळ नसल्यामुळे कधी कधी ठरवलेले मनातले बेतच रद्द करावे लागतात. असो तर काय झाल त्या दिवशी असाच मुलिंना कंटाळा आला रोजच्या जेवणाचा मग म्हणाल्या आज काहीतरी वेगळ कर. आता काय वेगळ म्हटल की पहिला मी पुस्तकं काढून बसायचे पण आता घेतला मोबाईल आणि युट्युबवर सर्च केल पोटभरीचेच म्हणजे जेवणासारखे कोणते पदार्थ करता येतील ते. तेव्हा चपात्यांमध्ये सजावट करुन भरलेल्या फ्रँकी दिसल्या. खरतर आपल्याच कडची आतली भाजी आणि चपाती पण फ्रँकी बोललं की कस विदेशी पदार्थ वाटतो. मग ठरवल आज फ्रँकी करू. थोड सामान बाजारातून आणल आणि खाली दिलेल्या रेसिपी प्रमाणे केली फ्रँकी.

मला साहित्य लागल ते म्हणजे


मेन म्हणजे चपाती. त्या आपल्या सगळ्यांकडेच होतात त्यामुळे मी त्याबद्दल मी काही देत नाही. फक्त जर तुम्हाला जास्तच मऊ वगैरे हव्या असतील तर थोडा मैदा मिसळायचा. पण मी मैदा टाळते त्यामुळे नेहमी सारख्याच चपात्या केल्या.

अमुल बटर
चाट मसाला
चिज
मेयॉनिज
गुंडाळण्यासाठी अ‍ॅल्यूमिनियम फॉईल

आतील कटलेटसाठीचे सामान


१ वाटी वाफवलेले मटार
२-३ मोठे बटाटे उकडून मॅश करुन
वाटीभर होईल अस कुस्करून पनीर
हिंग
हळद
मिरची पुड १ चमचा
१ चमचा गरम मसाला (आवडत असल्यास)
तेल
गरजे नुसार मिठ

काही सजावटीसाठी भाज्या


कोबी
गाजर
सिमला मिरची (मी तीन रंगाच्या घेतल्या आहेत. लाल, पिवळी आणि हिरवी)
कांदा
कोबी
ह्या सगळ्या भाज्या लांबट कापुन घ्यायच्या.

पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर हिंग, हळद टाकून मटार टाका. परतवुन मिरची पावडर व गरम मसाला घाला ते परतवल की पनीर आणि मॅश केलेला बटाटा घाला. मिठ घाला एक वाफ आल्यावर गॅस बंद करा.


हे मिश्रण थोड थंड झाल की त्याचे लांबट कटलेट बनवा.


हे कटलेट पॅनमध्ये थोड्या तेलावर शॅलो फ्राय करुन घ्या.


सजावटीच्या भाज्या एका पॅनमध्ये थोड्या तेलावर परतवा. त्यात चाट मसाला टाका. पण शिजवायच्या नाहीत. कडक राहिल्या पाहिजेत.


पहिला चपाती थोडी शेकवून चपातीला बटर लावून घ्या.


आता त्यावर मेयॉनिज पसरवा.


मध्यभागी सजावटीच्या भाज्या उभ्या लावायच्या आणि त्यावर कटलेट ठेवून त्यावर चिज किसून पसरवायच. वरून थोडा चाट मसाला भुरभुरवायचा


मग चपातीची जी बाजू बेस करणार आहोत ती आधी दुमडायची मग त्यावर बाजूच्या दोन बाजू दुमडायच्या.


गुंडाळून झाल की खाली अ‍ॅल्युमिनीयम फॉईल गुंडाळायची झाली तुमची फ्रॅ़ंकी तय्यार.


कशी दिसतेय?


उचला आता पटापट.

Monday 3 December 2018

भोपळ्याच्या फुलांची भजी


इतक्या दिवसांनी रेसिपी टाकतेय आणि मासे सोडून हिला फुलेच मिळाली का अस तुम्ही मनातल्यामनात नक्की म्हणत असाल ना. येतील येतील माशांच्याही अजून रेसिपी येतील लवकरच. पण बरेच दिवसांचा गॅप आधी पाना फुलांनी भरून काढुयात.

मी भोपळ्याच्या वेली लावल्या आहेत त्यावर रोज सुंदर पिवळी फुले फुलत असतात. अजून भोपळे लागले नाहीत व जी फुले येतात त्यांना भोपळे येणार नाहीत कारण येणार्‍या भोपळ्यावरच कळी येते. त्या एक दोन आहेत सध्या. तर अशी फुले सोडून रोज नुसती फुले खुप फुलतात. एक दिवस साधनाने ग्रुपवर एक सुंदर चायनिज व्हिडिओ टाकला. एक मुलगी परडी घेऊन शेतात जाते ताजी ताजी भोपळ्याची फुले काढुन परडीत टाकते. ती घरी आणते आणि धुवुन त्याची भजी बनवते. तो व्हिडिओ पाहिल्यापासून मला ती मुलगी व्हावेसे वाटू लागले आणि भोपळ्याची फुले मला रोज खुणावू लागली. एका शनीवारी सुट्टीत शेवटी मी ती मुलगी बनण्याचे ठरविले आणि तिच्यासारखी सुंदर परडी तर नव्हती माझ्याकडे पण घरातली एक प्लास्टीकची टोपली घेतली आणि निघाले फुले काढायला. मनात व्हिडिओतली म्युझिक वाजत होती व जणू त्या तालावर मी नाजूकपणे ती फुले खुडली. रेसिपी लिहायचीच होती व त्या फुलांना सोशल मिडीयावर सुप्रसिद्ध करण्याच्या हेतूने फोटो काढले.

१)
घरी जाऊन फुले परडीतच धुतली. फुलाच्या देढाचा भाग पुढे टाकलेल्या फोटोप्रमाणे कापले.
२)


त्यांना दुमडून घेतली.

३)
४)
एका वाडग्यात थोडे बेसनचे पीठ, चिमुटभर हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पूड, अर्धा चमचा धणा पावडर व चवीनुसार मिठ घेऊन पाणी घालून ते जाडसर एकत्र कालवून भिजवून घेतल .
५)
६)
आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम केले व पिठाच्या मिश्रणात फुले बुडवून ती उकळत्या तेलात सोडली.
७)
८)
मध्यम आचेवर पाच मिनीटांनी पलटून परत पाच मिनिटे शिजू दिली आणि तयार झाली भोपळ्याची कुरकुरीत भजी.
९)
१०)


भजी झाली आणि माझी ती चायनिज व्हिडिओतली भुमिका संपून मी जमिनीवर परतले आणि भजीचा आस्वाद घेतला.

अधिक टिपा :
भोपळ्याची फुले मला कधी बाजारात दिसली नाहीत त्यामुळे भोपळ्याचे बी लावण्या पासून तयारी करा.
भोपळा लागलेले फुल काढू नका भोपळ्याला इजा होण्याची शक्यता आहे.
पिठामध्ये धणेपूड नाही टाकली तरी चालेल.

Thursday 27 September 2018

चटपटीत शेवग्याच्या शेंगा



साहित्य:

चारपाच शेवग्याच्या शेंगा
फोडणी करीता राई, जिर, हिंग, हळद
१ चमचा मसाला अथवा अर्धा चमचा लाल तिखट
चवीनुसार मिठ
चिंच लिंबाएवढी
गुळ चिंचेपेक्षा थोडा जास्त
फोडणीपुरते तेल




पाककृती:

१) शेवग्याच्या शेंगांचे साधारण २ इंचाचे तुकडे करुन घ्या. जर शेंगा मोहाच्या असतील तर जास्त साले काढण्याची गरज नसते पण नेहमीच्या असतील तर जरा सोलून घ्या.

(ह्या मोहाच्य आहेत म्हणजे ह्या लवकर शिजतात तसेच आतला गर मऊ लागतो)


२) ह्या शेंगा थोडे मिठ घालून उकडून घ्या.

३) चिंचेचा कोळ करून घ्यात त्यातच गुळ चिरुन खुळा.

४) भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यात राई, जिर, हिंग, हळद ची पटापट फोडणी देऊन लगेच त्यात उकडलेल्या शेंगांचे तुकडे व चिंच-गुळाचा कोळ घाला. आता मसाला आणि चिंच गुळाच्या कोळेला लागेल एवढेच मिठ घाला कारण आधी शेंगांमध्ये घातले आहे.

५) आता वरील मिश्रण पळीने हलक्या हाताने किंवा फडक्याने भांडे धरून खालीवर करुन एकजीव करा व ५-७ मिनीटे शिजू द्या.

६) ह्या आहेत चटपटीत शेवग्याच्या शेंगा तय्यार.




अधिक टिपा:

अजून चटपटीत बनवण्यासाठी त्यात थोडा गोडा मसाला घालू शकता. वरून थोडी कोथिंबीर पेरू शकता.
चिंच गुळाचा कोळ घट् बनवा,

ह्या शेंगा साईड डिश म्हणून वापरता येते. लहान मुलांनाही आंबट गोड चवीमुळे खूप आवडतात.

Tuesday 31 July 2018

पिळसा



पिळसा मासा म्हणजे बोईट ह्या माश्याचे मोठे रुप. फ्रेश असेल तर चविला छानच लागतो.

साहित्य :

पिळसा मासा किंवा माश्याच्या तुकड्या
हळद अर्धा चमचा
2 चमचे मसाला
चविनुसार मिठ
तळण्यासाठी तेल
आल,लसुण वाटण 
क्रमवार पाककृती: 

पिळसा माश्याची खौले काढून त्याचे शेपुट, पर काढून टाका. त्याच्या पोटाकडील भागाला चिर देऊन पोटातील घाण काढून टाका. आता त्याच्या तुकड्या पाडा. (तुकडया करण्यासाठी धारदार कात किंवा विळी लागते. अन्यथा सरळ कोळणी कडूनच करुन घ्यायच्या तुकड्या). ह्या तुकड्या तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या.

(ह्या तुकड्या घरीच केल्या आहेत. फ्रिज मधुन काढून तुकड्या केल्याने गोठल्यामुळे व्यवस्थित तुकड्या पडलेल्या नाहीत तरी चांगल्या आकाराच्या मानून चालावे ही विनंती :हाहा:)
तुकड्यांना हळद, मसाला, मिठ चोळून घ्या.  आल-लसुण वाटण चोळा व एकत्र करुन वेळ असल्यास मुरवत ठेवा.


तवा मिडीयम फ्लेम वर ठेउन चांगला तापल्यावर त्यात तेल सोडा व त्यात तुकड्या तळण्यासाठी सोडा. पाच ते सात मिनिटे पहिली बाजू शिजून पलटा गरज वाटल्यास पलटल्यावर थोडे तेल साईडने सोडा. दुसरी बाजूही साधारण तेवढाच वेळ शिजवून घ्या.

(हे तेल जरा माझ्या हातून जास्तच पडले आहे. एवढ्या तेलाची गरज नसते. )
ह्या आहेत तयार चमचमीत, रुचकर पिळसा च्या तुकड्या.

Wednesday 25 July 2018

अळूवडी


हा आहे खास अळुवडीसाठी लागणारा काळा अळू.  ह्याची देठे काळी असतात व पाने गडद हिरवी.



साहित्य : 
८-१० अळूची पाने (धुवुन, मोठ्या पानांचे पाठचे कडक देठ थोडे तासुन)
बेसन २ वाट्या
अर्धा वाटी तांदळाचे पिठ
चिंचेचा कोळ
गुळ
मिरची पावडर अर्धा ते १ चमचा (तुम्हाला आवडत असेल तसे प्रमाण घ्या)
मिठ
आल लसुण पेस्ट
कांदा चिरुन भाजुन
सुके खोबरे किसुन भाजून थोडे कुस्करुन
१ चमचा तिळ
धणापूड शक्यतो घरी करून थोडी जाडसर
अर्धा चमचा गरम मसाला किंवा १ चमचा गोडा मसाला
तळ्यासाठी तेल

पाककृती:

ही आहेत अळूची ताजी ताजी पाने


वरील जिन्नसातील अळूची पाने आणि तेल वगळून बेसनमध्ये सगळे मिसळून घट्ट मिश्रण करावे.

पानाच्या मागच्य बाजूला जर पाने मोठी असतील तर मधल देढ थोडं जाड असत. ते सुरीने तासून घ्यायचे म्हणजे लोड वळताना त्रास होत नाही.

हे पहा मधल देठ


असे कापुन घ्यायचे म्हणजे वडी चांगली बसते. पोकळ राहात नाही.


नंतर पाट किंवा मोठे ताट घेउन त्यावर अळूचे पान उलटे ठेउन त्यावर पिठाचे मिश्रण सारवायचे.

मग दुसरे पान उलटेच पण विरुद्ध दिशेन लावायचे आणि त्यावर मिश्रण सारवायचे.

मग अशीच उलटी पाने एकमेकांच्या विरुद्ध लावायची एका लोड साठी मोठी असतील तर ५-६ आणि छोटी असतील तर ७-८ पाने लावायची. मग लावलेल्या चारी पानांच्या कडेची बाजु थोडी आत मोडून त्याचे लोड करायचे (चटई गुंडाळतात तशी)


आता उकडीच्या भांड्यात वाफेवर हे लोड ठेउन २० ते ३० मिनीटे हे लोड वाफवुन घ्यावेत.

थोडा धिर धरा मग थंड झाल्यावर लोडच्या सुरीने वड्या पाडा. तवा चांगला तापवुन त्यावर थोडे तेल पसरवुन त्यात अळूवड्या मंद गॅसवर खरपुस तळा.



अधिक टिपा:


आल लसुण पेस्ट तसेच कांदा खोबर न टाकताही प्लेन करता येतात. पण ह्यातील खोबर खाताना खुसखुशीत लागत. करुन बघाच.
कांदा खोबर्‍याची पेस्ट आजिबात करु नका चांगली नाही लागत तसाच चिरलेला तळून कांदा आणि किसुन भाजलेले खोबरे थोडे कुस्करुन टाका.
तळताना आवडत असल्याच मोहरीची फोडणी आणि वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर टाकु शकता.
गोडा मसाला आणि गरम मसाला दोन्ही थोडा थोडा टाकला तरी चांगला लागतो.

अशीच अळूवडी अळूची पाने चिरुनही करता येते. ज्यांना पाने लावण्याचे काम कटकटीचे वाटते त्यांने पाने चिरुन मिश्रणात मिसळुन लोड करुन वाफवायचे. कोथिंबीर किंवा कोबीच्या वड्यांप्रमाणे. पण इसमे मजा नही.