Tuesday 31 July 2018

पिळसा



पिळसा मासा म्हणजे बोईट ह्या माश्याचे मोठे रुप. फ्रेश असेल तर चविला छानच लागतो.

साहित्य :

पिळसा मासा किंवा माश्याच्या तुकड्या
हळद अर्धा चमचा
2 चमचे मसाला
चविनुसार मिठ
तळण्यासाठी तेल
आल,लसुण वाटण 
क्रमवार पाककृती: 

पिळसा माश्याची खौले काढून त्याचे शेपुट, पर काढून टाका. त्याच्या पोटाकडील भागाला चिर देऊन पोटातील घाण काढून टाका. आता त्याच्या तुकड्या पाडा. (तुकडया करण्यासाठी धारदार कात किंवा विळी लागते. अन्यथा सरळ कोळणी कडूनच करुन घ्यायच्या तुकड्या). ह्या तुकड्या तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या.

(ह्या तुकड्या घरीच केल्या आहेत. फ्रिज मधुन काढून तुकड्या केल्याने गोठल्यामुळे व्यवस्थित तुकड्या पडलेल्या नाहीत तरी चांगल्या आकाराच्या मानून चालावे ही विनंती :हाहा:)
तुकड्यांना हळद, मसाला, मिठ चोळून घ्या.  आल-लसुण वाटण चोळा व एकत्र करुन वेळ असल्यास मुरवत ठेवा.


तवा मिडीयम फ्लेम वर ठेउन चांगला तापल्यावर त्यात तेल सोडा व त्यात तुकड्या तळण्यासाठी सोडा. पाच ते सात मिनिटे पहिली बाजू शिजून पलटा गरज वाटल्यास पलटल्यावर थोडे तेल साईडने सोडा. दुसरी बाजूही साधारण तेवढाच वेळ शिजवून घ्या.

(हे तेल जरा माझ्या हातून जास्तच पडले आहे. एवढ्या तेलाची गरज नसते. )
ह्या आहेत तयार चमचमीत, रुचकर पिळसा च्या तुकड्या.

Wednesday 25 July 2018

अळूवडी


हा आहे खास अळुवडीसाठी लागणारा काळा अळू.  ह्याची देठे काळी असतात व पाने गडद हिरवी.



साहित्य : 
८-१० अळूची पाने (धुवुन, मोठ्या पानांचे पाठचे कडक देठ थोडे तासुन)
बेसन २ वाट्या
अर्धा वाटी तांदळाचे पिठ
चिंचेचा कोळ
गुळ
मिरची पावडर अर्धा ते १ चमचा (तुम्हाला आवडत असेल तसे प्रमाण घ्या)
मिठ
आल लसुण पेस्ट
कांदा चिरुन भाजुन
सुके खोबरे किसुन भाजून थोडे कुस्करुन
१ चमचा तिळ
धणापूड शक्यतो घरी करून थोडी जाडसर
अर्धा चमचा गरम मसाला किंवा १ चमचा गोडा मसाला
तळ्यासाठी तेल

पाककृती:

ही आहेत अळूची ताजी ताजी पाने


वरील जिन्नसातील अळूची पाने आणि तेल वगळून बेसनमध्ये सगळे मिसळून घट्ट मिश्रण करावे.

पानाच्या मागच्य बाजूला जर पाने मोठी असतील तर मधल देढ थोडं जाड असत. ते सुरीने तासून घ्यायचे म्हणजे लोड वळताना त्रास होत नाही.

हे पहा मधल देठ


असे कापुन घ्यायचे म्हणजे वडी चांगली बसते. पोकळ राहात नाही.


नंतर पाट किंवा मोठे ताट घेउन त्यावर अळूचे पान उलटे ठेउन त्यावर पिठाचे मिश्रण सारवायचे.

मग दुसरे पान उलटेच पण विरुद्ध दिशेन लावायचे आणि त्यावर मिश्रण सारवायचे.

मग अशीच उलटी पाने एकमेकांच्या विरुद्ध लावायची एका लोड साठी मोठी असतील तर ५-६ आणि छोटी असतील तर ७-८ पाने लावायची. मग लावलेल्या चारी पानांच्या कडेची बाजु थोडी आत मोडून त्याचे लोड करायचे (चटई गुंडाळतात तशी)


आता उकडीच्या भांड्यात वाफेवर हे लोड ठेउन २० ते ३० मिनीटे हे लोड वाफवुन घ्यावेत.

थोडा धिर धरा मग थंड झाल्यावर लोडच्या सुरीने वड्या पाडा. तवा चांगला तापवुन त्यावर थोडे तेल पसरवुन त्यात अळूवड्या मंद गॅसवर खरपुस तळा.



अधिक टिपा:


आल लसुण पेस्ट तसेच कांदा खोबर न टाकताही प्लेन करता येतात. पण ह्यातील खोबर खाताना खुसखुशीत लागत. करुन बघाच.
कांदा खोबर्‍याची पेस्ट आजिबात करु नका चांगली नाही लागत तसाच चिरलेला तळून कांदा आणि किसुन भाजलेले खोबरे थोडे कुस्करुन टाका.
तळताना आवडत असल्याच मोहरीची फोडणी आणि वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर टाकु शकता.
गोडा मसाला आणि गरम मसाला दोन्ही थोडा थोडा टाकला तरी चांगला लागतो.

अशीच अळूवडी अळूची पाने चिरुनही करता येते. ज्यांना पाने लावण्याचे काम कटकटीचे वाटते त्यांने पाने चिरुन मिश्रणात मिसळुन लोड करुन वाफवायचे. कोथिंबीर किंवा कोबीच्या वड्यांप्रमाणे. पण इसमे मजा नही.

टेंगळी सुकट

साहित्य 
१ वाटा टेंगळी सुकट
२ मोठे कांदे
१ वांग फोडी करुन
१ टोमॅटो किंवा कोकम
२ चमचे मसाला
अर्धा चमचा हळद
पाव चमचा हिंग
थोडी चिरलेली कोथिंबीर
१-२ मिरच्या मोडून
चवीनुसार मिठ
२ मोठे चमचे तेल

माश्याचे डोके व शेपूट काढून घ्या.
 पाककृती: 

निवडलेली टेंगळी पाण्यातुन चांगली धुवून काढा.

भांड्यात तेलावर कांदा गुलाबी रंगावर तळून घ्या. त्यावर हिंग, हळद्,मसाला घालून परता. ह्या मिश्रणावर टेंगळी, वांगी घाला व मध्यम आचेवर वाफेवर चांगली शिजू द्या. (चांगली वाफ येण्यासाठी भांड्याच्या ताटावर पाणी ठेवा.) वांगी शिजली की त्यावर मिठ, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर घालून परत एक वाफ द्या आणि गॅस बंद करा.

ही आहे तयार टेंगळी सुकट.

अधिक टिपा: 
ही रश्यापेक्षा सुकीच जास्त चांगली लागते. वांगे नाही घातले तरी चालते. पण कुठल्याही सुक्या माश्यांमधे वांगे चविष्ट लागते.

Tuesday 24 July 2018

भारंगीची वाल घालून भाजी




भारंगीचे झाड असते. पावसाळ्यात ह्या झाडाला छान कोवळी हिरवी पाने येतात त्याची भाजी करतात. 

हि भारंगीची फुले 

साहित्य : 
भारंगीच्या पानांना थोडा उग्र वास असतो. त्यामुळे ती आधी चिरून  पाण्यात एक उकळी काढून पिळून घेतात. 
मुके वाल म्हणजे   रात्री  भिजत घालून सकाळी भाजी करायला तयार असणारे मोड न आलेले वाल उकडून शिजवून घ्यावेत.  
२ कांदे
४-५ लसूण पाकळ्या
२-३ मिरच्या
हिंग
हळद
चविपुरते मिठ
पाव वाटी ओल खोबर किसुन
फोडणीसाठी तेल



पाककृती 

भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूणाची फोडणी देऊन मिरची व कांदा परतावा.

त्यावर हिंग व हळद घालून परतावे.




आता ह्यावर भारंगीची भाजी व  शिजवलेले वाल घालावेत. 



आता झाकण ठेऊन थोडावेळ शिजू दया व नंतर परता. 


आता मीठ व खोबरे घाला. आवडत असल्यास थोडी साखर घाला म्हणजे थोडी  चव येते. 

झाली भाजी तयार. 


अधिक टिपा :
भाजी अशीच   उकळून पिळून घ्यावी लागते नाहितर उग्र व कडवट लागते.  
ह्या भाजीत कोलंबी,  सुकट घालुनही  करता येते. 
वाल न घालताही साधी करता येते तसेच डाळी घालूनही करता येते.         


Wednesday 18 July 2018

सुरमई (फ्राय)

सुरमई ही मत्स्यप्रेमींची लाडकीच. त्यामुळे ही अर्थात कोळणींचीही लाडकीच. स्वस्त भावात सोडायला त्या तयार नसतात. 

सुरमई खात्री पुर्वक घ्यावी. कारण सुरमईच्या नावाखाली कुपा हा मासाही कोळणी खपवतात. कुपा माश्याला सुरमईची चव नसते. फक्त दिसायला साधारण तसाच असतो. सुरमई ही चकचकीत असुन छोट्या सुरमईच्या कातडीवर काळपट ठिपके असतात बाजुने तर मोठया सुरमई वरील फोटोत दाखवल्या प्रमाणे.




साहित्य :

सुरमईच्या ४-५ तुकड्या
चिमुटभर हिंग
हळद अर्धा चमचा चमचा
मसाला १ ते २ चमचे (तिखटाच्या आवडीवर)
मिठ अंदाजे
तळण्यासाठी तेल 

पाककृती :

१) सुरमईच्या तुकड्या स्वच्छ धुवुन घ्या.


२) तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन घ्या.


३) पॅन गरम करुन त्यात तेल चांगले गरम करा. गॅस मिडीयम ठेवा व त्यात तुकड्या सोडून द्या.



४) तुकड्या पातळ असतील तर ३-४ मिनीटे आणि जर जाड्या असतील तर मंद पेक्षा थोडा मोठा गॅस ठेउन ५-६ मिनीटे एक बाजु शिजवुन पलटून तेवढाच वेळ ठेवून गॅस बंद करावा. अगदीच रहावले नाही तर एक तुकडा जेवायच्या अधी मोडून खायला सुरमईची काहीच हरकत नसते




टिपा :

सुरमईचे कालवण इतर कालवणांसारखेच करतात.

तळताना तुमच्या आवडीनुसार आल-लसुण वाटण, लिंबु पिळून लावू शकता.

Thursday 12 July 2018

माकुल चिली


साहित्य :

नळ (पाईप्) माखुल
आल, लसुण, पेस्ट १ चमचा
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
१ ते दोन चमचे मसाला किंवा अर्धा चमचा मिरची पुड
२-३ पाकळ्या ठेचलेला लसुण
१ मोठा कांदा चिरुन
१ सिमला मिरची कापून तुकडे करून
थोडी चिरलेली कोथिंबीर
थोडिशी चिंच
चविनुसार मिठ
२ चमचे तेल.

माकुल साफ करणे म्हणजे थोडे कठीणच काम असते. माखली दोन प्रकारच्या असतात नळ माखली आणि सर्‍या किंवा मणेर माखली. ही आहे नळ माखली. हिच्या वरती पातळशी साल असते ती काढून टाकायची म्हणजे लवकर शिजण्यास मदत होते. ही साल काढल्यावर अगदी शहाळ्यासारखी माखले दिसु लागतात. 

ह्याचे डोके आणि शरीर हाताने सहज वेगळे होते. ते वेगळे करुन घ्यायचे. मग त्याच्या डोक्याच्या भागाला चिकटून काळसर भाग येतो तो काढुन टाकायचा आणि बाकीचा डोक्याचा चांगला भाग, शेपट्या आणि मांसल भाग घ्यायचा.  ( हे काम शक्यतो कोळणीवरच सोपवायचे) खालच्य रेसिपी साठी आपल्याला फक्त रींग्ज घ्यायाच्य आहेत.  

नळ  माखल्या साफ करुन त्या गोल कापा. त्या आधीच पाईपप्रमाणे असल्यामुळे गोल कापयला जास्त कलाकुसर करावी लागत नाहीत. म्हणजे व्हेज मधल्या पडवळासारखे.

पाककृती :

१. नळ माखळीच्या थोड्या रिंग्ज धुवून त्याला आल-लसुण पेस्ट लावून वेळ असल्यास थोडे मुरवुन किंवा डायरेक्ट कुकरला १० ते १५ मिनीटे शिजवून घ्या.

२. एका भांड्यात तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजवा.

३. आता त्यात हिंग, हळद, मसाला हे जिन्नस घालून थोडे परतवा आणि लगेच त्यात शिजलेल्या माकुळच्या रिंग्ज आणि सिमला मिरची घालून, मिठ घालून चांगले परतवा.


४. लगेच थोडा चिंचेचा कोळ घाला आणि त्यावर कोथिंबीर घालून परतवा. २-३ मिनीटे परतवून लगेच गॅस बंद करा.



ही डिश स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता व मेन कोर्स म्हणूनही घेऊ शकता.

टिपा:

चिंचे ऐवजी लिंबू वापरू शकता.
आवडत असल्यास थोडा गरम मसाला वापरू शकता.

Wednesday 11 July 2018

तळलेले पापलेट






ताजे पापलेट ओळखण्यासाठी ते कडक आहेत का बघा. तसेच त्यांच्यावर सुरकुत्या पडलेल्या नसल्या पाहीजेत.




साहित्य:
पापलेट
हळद
मसाला
मिठ
आल-लसुण्-मिरची-कोथिंबीर वाटण (ऑप्शनल)
तळण्यासाठी तेल

पाककृती:
पापलेट जर अगदीच मोठे असतील तर त्याच्या तुकड्या करुन घ्या. मिडीयम असतील आणि कमी जणांसाठी हवे असतील तर पापलेटचे शेपुट, बाजूची परे कापा. डोके आणि पोटाच्या मध्ये चिर देउन पोटातील घाण काढुन टाका आता त्या पापलेटच्या पोटांना वरुन चिरा द्या आणि मासे  धुवून घ्या. 


पापलेटांना वाटण, हळद, मसाला, मिठ लावुन थोडावेळ मुरवा.

आता तवा गॅसवर ठेवा आणि चांगला तापू द्या. जर तवा चांगला तापला नसेल तर तुकड्या चिकटतात. तापलेल्या तव्यावर तेल सोडा ते कालथ्याने पसरवा आणि त्यावर पापलेट शॅलोफ्राय करण्यासाठी सोडा.


४-५ मिनीटांनी पलटा, पुन्हा ५ मिनिटे शिजवून  गॅस बंद करा.  शिजवता गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा कमी ठेवा.

झाले तयार पापलेट. वास सुटलाय बघा.