Monday 11 June 2018

शेवळ



मे महिन्यात शेवळ येण्यास सुरुवात होते. जमिनीतून शेवळांचे टोकदार कोंब फुटतात. शेवळं ही खाजरी असतात म्हणून त्यांच्या खाजेवर मात करण्यासाठी रानफळ काकडं वापरतात. नुसत्या काकडांनाही ही खाज वाव देत नाही म्हणून अजून थोडी चिंचही घालावी लागते. शेवळ ही कडधान्यांत घालतात तसेच कोलंबी, सुकट, मटणाचा खिमा अशा मांसाहारी पदार्थातही घालतात. 
काही ठिकाणी शेवळे सुकवून वर्षभराच्या साठवणीसाठीही ठेवतात. 

वर्षातून एकदा मिळणारी ही शेवळं करण्याच्या बर्‍याच पद्धती आहेत. त्यातील एक खालची पद्धत.


४-५ जुड्या शेवळं
१०-१२ काकडं
१ वाटी वालाच बिरडं
तेल फोडणीसाठी
राई
जिरं
हिंग
हळद १ चमचा
लाल मसाला २ चमचे
१ चमचा गरम मसाला
१ चमचा आल-लसुण वाटण
चिंच लिंबाएवढी
गुळ
थोडी चिरलेली कोथिंबीर
२ मिरच्या
२ चिरलेले कांदे
अर्धा वाटी खवलेल ओल खोबर
चविनुसार मिठ




पाककृती
शेवळ खालील प्रमाणे निवडून घ्यावीत.

शेवळाची चॉकलेटी साले काढून  टाकावीत त्यात खालील प्रमाणे दांडी दिसते. त्यातील जो गडद पिवळ्या रंगाचा दाणेदार भाग दिसतो तो  काढून टाकावा. 


रात्री ही शेवळं चिरुन पाण्यात ठेवावीत.

सकाळी ह्या शेवळातल पाणी काढून टाकायच.
काकड ठेचून त्यातल्या बिया काढून टाकायच्या आणि गर मिक्सरमधून वाटून घ्यायचा.


कुकरमध्ये तेल गरम करून त्यावर राई, जिर घालून कांदा गुलाबी रंगावर परतावा. मग त्यावर आल लसुण पेस्ट घालून हिंग, हळद, मसाला घालायचा. त्यावर शेवळ व काकडाच वाटण घालून परतून थोडी वाफ येऊ द्यायची. मग त्यावर बिरडं घालून गरम मसाला, मिठ, चिंचेचा कोळ व गुळ घालून गरजेपुरते पाणी घालायचे. 

आता कुकरचे झाकण बंद करून ३ शिट्या घ्यायच्या. कुकरचे झाकण उघडले की त्यावर कोथिंबीर व मिरच्या मोडून ढवळायच.

ही आहे तयार शेवळांची आमटी.

टिपा:
नॉनव्हेजमध्ये शेवळं घातल्यावर गुळ वापरत नाहीत.   कडधान्यामध्येही काही वेळा गुळ वापरत नाहीत.  सुके  खोबरे व कांदा ह्यांचे वाटणही घालतात. 

शेवळाची कंद असतात. ही टोकदर शेवळे फुलल्या नंतर  कंदातून पाने बाहेर येतात. त्या कोवळ्या पानांचीही भाजी करतात.  तीही खाजरी असते व त्यालाही भरपूर चिंच घालावी लागते.

No comments: