Wednesday 25 July 2018

अळूवडी


हा आहे खास अळुवडीसाठी लागणारा काळा अळू.  ह्याची देठे काळी असतात व पाने गडद हिरवी.



साहित्य : 
८-१० अळूची पाने (धुवुन, मोठ्या पानांचे पाठचे कडक देठ थोडे तासुन)
बेसन २ वाट्या
अर्धा वाटी तांदळाचे पिठ
चिंचेचा कोळ
गुळ
मिरची पावडर अर्धा ते १ चमचा (तुम्हाला आवडत असेल तसे प्रमाण घ्या)
मिठ
आल लसुण पेस्ट
कांदा चिरुन भाजुन
सुके खोबरे किसुन भाजून थोडे कुस्करुन
१ चमचा तिळ
धणापूड शक्यतो घरी करून थोडी जाडसर
अर्धा चमचा गरम मसाला किंवा १ चमचा गोडा मसाला
तळ्यासाठी तेल

पाककृती:

ही आहेत अळूची ताजी ताजी पाने


वरील जिन्नसातील अळूची पाने आणि तेल वगळून बेसनमध्ये सगळे मिसळून घट्ट मिश्रण करावे.

पानाच्या मागच्य बाजूला जर पाने मोठी असतील तर मधल देढ थोडं जाड असत. ते सुरीने तासून घ्यायचे म्हणजे लोड वळताना त्रास होत नाही.

हे पहा मधल देठ


असे कापुन घ्यायचे म्हणजे वडी चांगली बसते. पोकळ राहात नाही.


नंतर पाट किंवा मोठे ताट घेउन त्यावर अळूचे पान उलटे ठेउन त्यावर पिठाचे मिश्रण सारवायचे.

मग दुसरे पान उलटेच पण विरुद्ध दिशेन लावायचे आणि त्यावर मिश्रण सारवायचे.

मग अशीच उलटी पाने एकमेकांच्या विरुद्ध लावायची एका लोड साठी मोठी असतील तर ५-६ आणि छोटी असतील तर ७-८ पाने लावायची. मग लावलेल्या चारी पानांच्या कडेची बाजु थोडी आत मोडून त्याचे लोड करायचे (चटई गुंडाळतात तशी)


आता उकडीच्या भांड्यात वाफेवर हे लोड ठेउन २० ते ३० मिनीटे हे लोड वाफवुन घ्यावेत.

थोडा धिर धरा मग थंड झाल्यावर लोडच्या सुरीने वड्या पाडा. तवा चांगला तापवुन त्यावर थोडे तेल पसरवुन त्यात अळूवड्या मंद गॅसवर खरपुस तळा.



अधिक टिपा:


आल लसुण पेस्ट तसेच कांदा खोबर न टाकताही प्लेन करता येतात. पण ह्यातील खोबर खाताना खुसखुशीत लागत. करुन बघाच.
कांदा खोबर्‍याची पेस्ट आजिबात करु नका चांगली नाही लागत तसाच चिरलेला तळून कांदा आणि किसुन भाजलेले खोबरे थोडे कुस्करुन टाका.
तळताना आवडत असल्याच मोहरीची फोडणी आणि वरुन थोडी चिरलेली कोथिंबीर टाकु शकता.
गोडा मसाला आणि गरम मसाला दोन्ही थोडा थोडा टाकला तरी चांगला लागतो.

अशीच अळूवडी अळूची पाने चिरुनही करता येते. ज्यांना पाने लावण्याचे काम कटकटीचे वाटते त्यांने पाने चिरुन मिश्रणात मिसळुन लोड करुन वाफवायचे. कोथिंबीर किंवा कोबीच्या वड्यांप्रमाणे. पण इसमे मजा नही.

No comments: