Thursday 21 June 2018

अंबाड्याचे लोणचे


अंबाडे म्हणजे लहानपणीचा रानमेवा. लहान असताना अंबाडे म्हणजे आंबट कैरीसारखे तिखट मिठ लावून खाण्याचा एक टाईमपास खाऊ. ह्याचे मोठे झाड असते. जेव्हा अंबाड्याचा सिझन नसतो तेव्हा आम्ही लहानपणी ह्या झाडाचे देठ व कोवळी पाने खायचो. त्यालाही आंबाड्याचा वास व आंबटपणा असायचा. आंबाडे खाताना एक विशिष्ट गंध जाणवतो अंबाड्याचा. हे पिकले की बाठा तयार होऊन पिवळे होतात. गर मऊ होतो व थोडी गोडच चव व अंबाड्याचा विशिष्ट वास एकत्र झाल्याने खायला मजा येते. कच्चे अंबाडे मिठात मुरवूनही खातात. मिठाच्या पाण्यात अंबाडे टाकून ठेवायचे व साठवणूक करुन हवे तेव्हा खायचे. अंबाड्याची चटणी, रायते केले जाते. जुन-जुलै दरम्यान लोणच्यासाठी तयार होतात. शक्यतो बाठा धरण्यापूर्वीच लोणचे घालायला घ्यायचे. म्हणजे गरही जास्त मिळतो आणि कापायलाही सोपे पडतात.


आता आपण रेसिपी पाहू.

१ किलो अंबाडे
पाव किलो जाडे मिठ (नसेल तर घरचे बारीक चालेल)
१०० ग्रॅम राईची डाळ
१ चमचा मेथी
१ छोटा चमचा हिंग
४ चमचे हळद
८ चमचे लाल तिखट
तेल पाव किलो (गरज लागल्यास जास्तही लागू शकत).

अंबाडे स्वच्छ धुवून त्याच्या उभ्या चार फोडी कराव्या.

मिठ भाजून घ्यायचे, थोड्या तेलावर मेथी परतायची. मिठ व मेथी एकत्रच मिक्सरमधे बारीक करून घ्या.
आता मोहरीचा गर, हिंग, हळद्, लाल तिखट, व बारीक केलेले मेथीसकट मिठ एकत्र करून घ्या.

हे मिश्रण अंबाड्यांच्या फोडींवर मिसळून घ्या.
कढईत तेल चांगले कडकडीत तापवून मग थंड करुन ह्या मिश्रणावर ओतुन एकजीव करा.
झाले लोणचे तयार. आठ दिवसांनी खायला काढा.


टिपा: 


बरणीत भरल्यावर तेल फोडींच्या वरती राहील असे पहा म्हणजे खराब होणार नाही. जर तेल कमी पडत असेल तर अजून गरम करून थंड करून घाला.

लहान मुलांना हे लोणच जास्त आवडत.

1 comment:

Unknown said...

Facebook mast todala Pani sutle