Tuesday 7 July 2020

तालिमखाना/कोकीलाक्षा रानभाजीच्या वड्या

माझ्या आधिच्या लेखामध्ये तालिमखाना बद्दल मी लिहीले आहे व भाजीची रेसिपीही दिली आहे.

https://gavranmejvani.blogspot.com/2020/06/blog-post.html?m=1

पण भाजी म्हटल की कंटाळत खातात सगळे त्यात लहान मुले तर हातच लावत नाहीत. म्हणुन या पावसाळ्यात रानभाज्या वेगवेगळ्या प्रकारात करायच ठरवल आणि त्यातून तयार झाली खमंग, खुसखुशीत तालिमखान्याची वडी. चला तर मग रेसिपी पाहुया.

तालिमखान्याची कोवळी भाजी घ्या.


ही  धुवून त्याची पाने काढा.


आता खालील साहित्य घ्या.
चिरलरली तालिम खान्याची पाने
१ वाटी बेसन
आल,लसुण,मिरची, कोथींबीर पेस्ट १ मोठा चमचा
चिमटीभर हिंग
एक चमचा हळद
१ किंवा दोन चमचे लाल तिखट
अर्धा चमचा जिरे पूड
१ चमचा धणे पूड
मिठ
अर्ध्या लिंबाचा रस
तेल




तेल सोडून वरील सर्व जिन्नस एकत्र करा



हळू हळू मावेल इतक पाणी घालून. एकजीव करुन घ्या. जास्त घट्ट नको आणि पातळही नको.


आता हे वाफवायच . मोदक पात्र किंवा मोठ्या पातेल्यात पाणी ठेउन त्यात. अस ताट किंवा भांड ठेउन हे वाफवता येईल. ज्यात वाफवणार आहात त्या भांड्याला तेल लावा आणि वरील मिश्रण भांड्यात पसरवून एका लेव्हलला लावा आणि अर्धा तास मध्यम आचेवर वाफवून घ्या.

वाफवून झाल की जरा थंड होउद्या मग सुरीने त्याच्या वड्या पाडा.


तवा गरम करुन त्यात तेल घालून या वड्या शॅलोफ्राय करा आणि सर्व्ह करा आणि मस्त आस्वाद घ्या. या वड्या चविलाही चान लागतात आणि खुसखुशीतही होतात.

 टीप
खुसखुशीतपणा येण्यासाठी पाव वाटी तांदळाचे पीठ मिश्रणात मिसळा. रानभाजीच्या वड्या आहेत हे वाटतच नाही खाताना. टेस्टी होतात.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे.

Friday 26 June 2020

तालिमखाना

माझ्या  बालपणी उरण नागावात रहात असलेल्या आमच्या घराच्या समोरच आमच एक मोठं शेत होत. शेताला लागूनच गावचा मुख्य रस्ता अाणि रस्त्याच्या पलिकडे पावसाचे पाणी वाहून नेणारा मोठा विरा (नाला) होता. पावसात विरा पूर्ण भरुन त्याचे पाणी रस्त्यावर येउन आमच्या ह्या शेतात यायच. अती पाण्याच्या ओढ्यामुळे हे शेत आम्हाला  वापरता येत नसे व ते तसेच बिन लागवडीच रहायच. पण हे बिनलागवडीच शेत मला प्रचंड आवडायच याच कारण त्यात चिवणे मासे यायचे आणि त्या माशांना अचुक नेमाने टिपून आस्वाद घेण्यासाठी बगळे यायचे आणि आमच्या घराच्या बाजूलाच असलेल्या चिंचेच्या झाडावर दर पावसाळ्यात हे बगळे आमच्या घराच्या शेजारी असलेल्या चिंचेच्या झाडावर काड्यांची घरटी करुन वस्ती करुन रहायचे. समोरच्या  घरांत लाडाने पाळलेली बदके या शेतात पोहायला येत ती तरंगती  पहाताना खुप गंमत वाटायची. शांत रात्रीला शेतातील बेकांची डराव डराव वेगळच वातावरण निर्मिती करायची. दिवसा शेत माझ्यासाठी तळं असायच.  पाण वनस्पतीही शेतात उगवायच्या साधारण आॅगस्ट मध्ये पावसाचा जोर कमी झाला की पाणी शेतातील पाणी कमी व्हायच आणि हळु हळु तळ गाठायच तेव्हा या शेतात हिरवी गर्द रोपे उगवायला सुरुवात व्हायची आणि पहाता पहाता सप्टेंबर आॅक्टोबर मध्ये एकाच आकारात आणि उंचीत उंच खोडाला गोलाकार काही अंतरावर झुबक्याने लांबलचक, टोकदार  काटे असलेले हिरवेगार जंगल शेतात तयार व्हायचे. ही झुडपे सुचिपर्णी वृक्षाप्रमाणे  अशी दिसायची की जणू काश्मिरच जंगलच . आम्ही याला काश्मिरच म्हणायचॊ. थोड्या दिवसांनी या झुडुपांना मन मोहून टाकणारी आकर्शक निळ्या रंगाची फुले लागायची तेव्हा तर स्वर्गात आल्यासारखच वाटायच.

शेत निळाईत न्हाउन निघायच.  ही स्वर्गिय रुपाची झाडे होती तालिमखान्याची. पण तेव्हा मला तालिमखाना हे नाव माहित नव्हते ते आता नेटवर्कच्या जमान्यामुळे कळले. ह्यालाच कोकिलाक्ष असेही नाव आहे.  तेव्हा आमच्याकडे याला शुद्ध भाषेत कोरंटी आणि गावठी भाषेत कोलेटाची झाड म्हणायचे. त्यावेळी गज-यांची सगळ्याच बायकांना हौस असायची आमच्याइथल्या काही बायका रोज या तालिमखान्याच्या कळ्या काढायला यायच्या. अहो सुंदर गज-यापुढे काट्याकुट्यांची तमा कुणाला! फिरकीचे सुंदर गजरे करुन बायका मुली यांचे गजरे आपल्या केसांत माळून केसांच सौंदर्य खुलवीत असत. मला तर फुलांची प्रचंड हौस मग मी कशी मागे पडणार. पण घुसायचे त्या काटेरी झुडपांत आणि कळ्या काढत बसायचे. काटे टोचायचे बोटांना पण उटोचण्याला फुलांचा सहवास फुंकर घालून मन उल्हासित करत असे. याच्या फुलांध्ये मध असते. चाळा म्हणुन मधुन मधुन ती ही  मुले फुलातुन ओढायचो. उन्हाळा आला की ही झाडे सुकुन जायची. मग काही बायका याच्या बिया काढायला यायच्या. त्यांच्या बोलण्यातून समजल की या बियांची पेज करतात ती शक्तीवर्धक असते व पुरुषांसाठी ती जास्त लाभदायक असते. बियांचे लाडूही करतात. नंतर झाडे संपुर्ण सुकली की वडील शेत साफ करुन घ्यायचे. ती सुकलेली झाडे तोडून जाळून घ्यायचे पण असे केले तरी दर वर्षी ही रोपे बिया मातीत रुतून राहिल्याने स्वर्ग निर्माण करण्यासाठी नविन जन्म घ्यायचीच.

शेतातील पाण्यामुळे ही  ही शेतात उशीरा दिसत असली तरी पाऊस पडल्यावर काही दिवसातच आमच्या वाडीतील ओसाड जागेत ही वनस्पती आपल्या हिरव्या चमकदार पानांसह डोलू लागायची.  मागिल वर्माषाच्या मुळा-खोडातून आणि पडलेल्या बियांपासून तालिमखान्याचे नविन कोंब यायचे.  माझी आई हया तालिमखाना वनस्पतीचे कोवळे बोखे तोडून आणायची आणि  बनवायची. आईची ही आवडीची भाजी होती आणि औषधी म्हणुन ती दर वर्षी आवर्जून करुन घरात सगळ्यांना खायला लावायची. कंबर वर ही औषधी आहे अस ती अजूनही सांगते. नाविन्यपूर्ण म्हणुन मलाही ती आवडायची. विशेष म्हणजे आईसोबत ती ओळखून खुडण्यात मला जास्त मजा वाटायची. नविनच उगवते तेव्हा तिला काटे नसतात. कोवळी गुळगुलीत  व देठांना लव असतात. पानांना थोडा उग्र वास येतो.


आई तेव्हा टीप द्यायची काटे आले नसतील असेच बोखे तोडायचे म्हणजे काटेही रुपत नाहीत आणि कोवळी असल्याने चविलाही चांगली लागते. हळू हळु मला आई कडुन तिची रेसिपीही कळली. लग्न झाल्यावर सासरच्या आमच्या काही पडीक जागेत ही भाजॊ उगवते ती यायची मी वाटच पहात असते. ती उगवली की आईच्या रेसिपी प्रमाणे ही भाजी बनवते ती खालील प्रमाणे.

तालिमखानाची भाजी पाककृती
२ कांदे
४-५ लसूण पाकळ्या
२-३ मिरच्या
हिंग
हळद
चविपुरते मिठ
पाव वाटी ओल खोबर किसुन
फोडणीसाठी तेल





तालिमखानाची भाजी स्वच्छ धुवुन चिरुन घ्यावी.

भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूणाची फोडणी देऊन मिरची व कांदा परतावा.

त्यावर हिंग व हळद घालून परतावे.

आता त्यावर  चिरलेली भाजी घालावी व  दोन  तीन मिनीटे झाकण  ठेवावे म्हणजे भाजी आकसून व्यवस्थित  ढवळता येते. 

चार-पाच मिनीटे शिजली की त्यावर मिठ घालून परता. मग ओल खोबर घाला आणि परता.

ही झाली तयार भाजी.




 टिप: 
भाजीची चव अजून बदलण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी त्यात टोमॅटो, साखर डाळी घालता येईल.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे