Thursday 21 June 2018

कोलंबीचे सुके व तळलेली कोलंबी



कोलंबी म्हणजे सगळ्यांच्याच परिचयाची. लहान मुलांसाठी तर अगदी आवडीचीच. कोलंबी आवडत नाही अशी मांसाहार करणार्‍या व्यक्तिमध्ये फार क्वचीत व्यक्ती आढळतील.

कोलंबीमध्येही काही प्रकार असतात. लाल कोलंबी, पांढरी कोलंबी, करपाली नावाने ओळखल्या जाणार्‍या कोलंब्या. ह्या काळ्या रंगाच्या असतात.

लाल कोलंबी


सफेद कोलंबी



करपाली/टायगर  प्रॉन्स


आज आपण  कोलंबीचे सुके व कोलंबी फ्रायची रेसिपी पाहुया. 

कोलंबीचे सुके
कोलंबी
२ मोठे कांदे
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
२ चमचे आल्,लसुण,मिरची, कोथिंबीर पेस्ट
हिंग, हळद
आग्री मसाला किंवा मालवणी मसाला
मिठ
तेल
कोकम किंवा टोमॅटो किंवा कैरी

पाककृती: 

१)जर कोलंबी सुकी करायची असेल आणि कोलंबी एकदम ताजी असेल तर तिला न सोलता फक्त शेपटी आणि टोक्याचा थोडा भाग काढुन मधले पाय काढायचे व कोलंबी स्वच्छ धुवुन घ्या.

२) धुतलेल्या कोलंबीला आल-लसुण्-मिरची-कोथिंबिरच वाटण चोळा. थोडी मुरवलीत तर अजुन छान.

३) भांड्यात तेल करम करुन लसुण पाकळ्यांची फोडणी देउन त्यावर कांदा गुलाबी रंग येईपर्यंत तळा.


४) कांदा बदामी रंगाचा झाला की त्यावर हिंग, हळद, मसाला टाकून  थोडे परतवा.

५) आता ह्यावर कोलंबी घालून ती परतवा.



६) नंतर भांड्यावर झाकण ठेउन झाकणावर पाणी ठेउन मिडीयम गॅसवर कोलंबी शिजु द्या. मधुन मधुन ढवळा.

७) थोड्या वेळाने झाकण काढून त्यात कैरी/कोकम व मिठ टाका आणि परतवा.

८) परत झाकण ठेउन वाफ येउ द्या. ५ मिनीटांत कोलंबी तयार. कशी दिसतेय ? घाबरु नका लाल रंग दिसतोय तेवढी ती तिखट नाही.



तळलेली कोलंबी 
कोलंबी
आग्री मसाला किंवा मालवणी मसाला
मिठ,
हळद
आल-लसुण पेस्ट (ऑप्शनल किंवा जर साल काढली असतील तर तेंव्हा चांगली लागते)
तेल
पाककृती: 
१) कोलंबीची साले काढा किंवा वरील प्रमाणे ठेवा.

२) सोललेल्या कोलंबीला मिठ, मसाला, हळद, आल-लसुण पेस्ट लावा वेळ असेल तर थोडी मुरु द्या.

३) तवा गरम करुन त्यावर तेल सोडून कोलंबी शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवा.

४) कोलंबी शिजायला थोडा वेळ लागतो म्हणुन गॅस मिडीयम पेक्षा कमी ठेउन चांगली शिजु द्या. ७-८ मिनीटांनी पलटुन गरज वाटल्यास थोड तेल टाकुन परत शिजवुन गॅस बंद करा.




कोलंबीचे कालवणही टेस्टी होते. त्यातही कांदा घालावा लागतो. वाटण ऑप्शनल असते. पुरवढ्यासाठी कालवणात बटाटा, दुधी,लाल भोपळा, सुरण, शेवग्याच्या शेंगा टाकतात.

कोलंबीची भजी, मसाला कोलंबी, कोलंबीचे दबदबीत, कोलंबीचे पॅटीस, कोलंबी पुलाव आणि अजून बरेच प्रकार कोलंबी पासून करता येतात.

जर कोलंबी जास्त जाड असेल आणि सोलली असेल तर त्यातील काळा धागाही काढतात. साला सकट कोलंबी जास्त रुचकर लागते. खाताना तिचे साल चावण्यात मजा येते.

कोलंबी जास्त प्रमाणातही खाऊ नये बाधण्याची शक्यता असते. पथ्यात कोलंबी वर्ज्य असते.

No comments: