Wednesday 27 June 2018

वालाची पालेभाजी



वालाची पालेभाजी सहसा बाजारात मिळत नाही. उन्हाळ्यात जेंव्हा आपण साठविण्यासाठी वाल घेतो तेंव्हा त्यातील किडके वाल बाजूला काढतो. हेच किडके वाल न टाकता बाजूला ठेऊन आपल्याला हवे तेंव्हा कुंडीत किंवा जमिनीवर पेरायचे. त्याला मोड येऊन दोन पाने मोठी आली की ही भाजी काढायची. भाजी हवी असल्यास चांगले वालही पेरू शकता. साधारण ८-१० दिवसांत भाजी काढण्यासाठी तयार होते. पण शक्यतो तिसरे पान यायच्या आत काढायची नाहीतर पाने जून होतात.

साहित्य :
 
वालाची पालेभाजी
दोन मोठे कांदे चिरुन
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
५-६ लसुण पाकळ्या ठेचुन
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
चवीनुसार मिठ आणि साखर
पाव वाटी तेल
मुठभर ओल खोबर


 हया भाजीची पाने चिरुन घ्या. थोडासा देठाचा कोवळा भाग घेतला तरी चालतो.
भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यावर लसुण पाकळ्यांची फोडणी द्या. लसुण जरा लालसर होऊ द्या म्हणजे चांगला वास येतो. त्यावर मिरची व कांदा घालून परता. वरून हिंग व हळद घालून कांदा परता.
कांदा शिजवायची गरज नसते पालेभाजीला. लगेच चिरलेली भाजी घालून परता.
आता भाजीवर झाकण द्या आणि ५ मिनिटे मिडीयम गॅसवर शिजू द्या. भाजी शिजली की त्यावर मिठ, साखर घाला आणि ढवळून वरून खोबरे घाला व परता.


पुन्हा एकदा झाकण ठेऊन २-३ मिनीटे ठेवा वाफ येण्यापुरती व गॅस बंद करा.

ही आहे तय्यार वालाची पालेभाजी.

अशा प्रकार मुग, मटकीचीही पालेभाजी करता येते. 

No comments: