Monday 18 June 2018

कांदा भजी / खेकडा भजी



बाहेर धो-धो कोसळणारा पाऊस आणि वातावरणात आलेला गारवा अशा वेळी इच्छा होते ती गरमागरम, चटपटीत खाण्याची. पाऊस आणि कांदा भजी हे समिकरण तर खुपच जुळून येत. गरमागरम कांदाभजी, चहा आणि आवडते संगित एकत्र आले की हा पावसाळा सुखद होऊन जातो. पाहुया खमंग आणि खुसखुशीत कांदाभजीची रेसिपी. खेकड्यासारखी दिसते म्हणून खेकडा भजी म्हणतात बाकी ह्याचा खेकड्याशी काही संबंध नाही.

लागणारे जिन्नस

३ ते ४ मोठे कांदे

बेसन पाव किलो

२-३ मिरच्या चिरुन किंवा मिरची पुड

थोडी कोथिंबीर चिरुन

चिमुटभर हिंग

पाव चमचा हळद

अर्धा चमचा धणे घसपटून किंवा पाव चमचा ओवा किंवा पाव चमचा जिरे (ऑप्शनल)

मिठ

तेल


पाककृती


प्रथम कांदे उभे चिरुन घ्या. चिरलेल्या कांद्याला थोडे मिठ मिसळा. ५-६ मिनीटांत मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल.
आता कांदा चांगला चुरा व त्यात हिंग, हळद, मिरची किंवा मिरची पुड, कोथिंबीर, ओवा/धणे/जिरे ह्यापैकी एक हवे असल्यास, टाकावे. नंतर त्यात थोडे थोडे बेसन टाकत रहावे.
पाणी आजीबात टाकू नये. कांद्याला सुटलेल्या पाण्यातच मिश्रण घटासर होईपर्यंत बेसन टाकावे. अगदी घट्टही करू नये. अंदाजे किंवा पिठाची चव पाहून जर मिठ अजुन हवे असेल तर टाकावे.
एका कढईत तेल चांगले गरम करावे व त्यात चमच्याचे किंवा हाताने खेकडे म्हणजे भजी सोडावी Happy गॅस मंद ठेवावा. म्हणजे खेकडे म्हणजे भजी कुरकुरीत होते व आतुन चांगली शिजते.
मंद गॅसवर उलथापालथ करून भजी कुरकुरीत तळून झाली की ४-५ हिरव्यागार आख्या मिरच्यांना मधुन चिर पाडावी व कढईत टाकून जरा परतून लगेच बाहेर काढावीत. मिरच्यांवर थोडे मिठ चोळायचे आणि कुरकुरीत भजी सोबत ह्या मिरच्या मटकवायच्या.

टिपा: 
धणे, जिर, ओवा ऑप्शनल आहे आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालते. पण टाकल्यास स्वाद येतो. काहीतरी एकच टाकावे.
मला एका हॉटेलवाल्याकडून माहीती मिळाली की तेल थंड असतानाच भजी टाकली की ती चांगली कुरकुरीत होते पण मी अशी रिस्क कधी घेतली नाही. वरील पद्धतीने चांगली कुरकुरीत होते.

No comments: