Thursday, 14 June 2018

खेंगट



पावसाची सुरुवात झाली की वेध लागतात ते खेंगटाचे. मांदेली, बोंबील आणि कोलंबी ह्याचा एकत्र वाटा. मासे पकडणार्‍यांच्या जाळ्यात हे मासे एकत्र येतात ते न निवडता म्हणजे वेगवेगळे न करता पुर्वी वाटे करायचे त्याला खेंगट म्हणतात. ह्यात इतर मासे जसे कालेट, ढोमा, बांगडा, खेकडे असे छोटे मासे पण येतात पण ते काढून टाकायचे. पुर्वी स्वस्त व मस्त अगदी गरिबांनाही परवडेल अस हे खेंगट असायच. पावसाळ्यात हे खेंगट भरपुर येत आणि अगदी ताज-तवान येत. पण हल्ली खुप कमी असे एकत्र खेंगटाचे वाटे येतात. कारण हल्ली कोळणी मासे निवडून वेगवेगळे विकायला ठेवतात. त्यामुळे कधी कधी खेंगट करायचे म्हटले तर तिघांचे वेगवेगळे वाटे घ्यायचे आणि एकत्र करायचे.

खेंगट १ ते २ वाटे
लसुण एक गड्डा ठेचुन
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
२ चमचे रोजच्या वापरातील लाल मसाला/ आग्री मसाला किंवा मालवणी मसाला
पाव वाटी तेल
पाउण वाटी चिंचेचा कोळ
मिठ गरजे नुसार
२ हिरव्या मिरच्या मोडून
थोडी कोथिंबीर चिरुन

खेंगटातील बोंबील, मांदेली आणी कोलंबी साफ करुन घ्या. इतर मासे असतील तर काढून टाका.


खेंगट करण्याचे दोन प्रकार आहेत एकात माश्यावर वरील साहित्यातील सगळे जिन्नस अगदी तेलासकट मिक्स करायचे. उकळी आल्यावर ५ मिनीटे मिडीयम गॅसवर शिजवायचे. झाले खेंगटचे कालवण तैयार.

दुसरी पद्धत.
भांड्यात तेल चांगले गरम करायचे. त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी द्यायची. त्यावर हिंग, हळद, मसाला घालून लगेच खेंगट घालून त्यावर चिंचेचा कोळ घालायचा. मिठ घालायचे. मग उकळी आली की त्यावर मोडलेल्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून ३-४ मिनीटांत गॅस बंद करायचा.

अधिक टिपा:


अप्रतिम चव असते खेंगटाची. अगदी रोज खाल्ला तरी कंटाळा येत नाही.

ह्यात जास्त पाणी घालायचे नाही कारण बोंबील आणि कोलंबीला पाणी सुटते. शिवाय चिंचेच्या दाट कोळातच ह्याची मजा असते.

खेंगट शेजवताना गॅस नेहमी मिडीयम ठेवायचा. नाहीतर बोंबील गळून पडतात. मांदेलीचे तुकडे होतात.

No comments: