Showing posts with label मासे. Show all posts
Showing posts with label मासे. Show all posts

Tuesday, 31 July 2018

पिळसा



पिळसा मासा म्हणजे बोईट ह्या माश्याचे मोठे रुप. फ्रेश असेल तर चविला छानच लागतो.

साहित्य :

पिळसा मासा किंवा माश्याच्या तुकड्या
हळद अर्धा चमचा
2 चमचे मसाला
चविनुसार मिठ
तळण्यासाठी तेल
आल,लसुण वाटण 
क्रमवार पाककृती: 

पिळसा माश्याची खौले काढून त्याचे शेपुट, पर काढून टाका. त्याच्या पोटाकडील भागाला चिर देऊन पोटातील घाण काढून टाका. आता त्याच्या तुकड्या पाडा. (तुकडया करण्यासाठी धारदार कात किंवा विळी लागते. अन्यथा सरळ कोळणी कडूनच करुन घ्यायच्या तुकड्या). ह्या तुकड्या तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्या.

(ह्या तुकड्या घरीच केल्या आहेत. फ्रिज मधुन काढून तुकड्या केल्याने गोठल्यामुळे व्यवस्थित तुकड्या पडलेल्या नाहीत तरी चांगल्या आकाराच्या मानून चालावे ही विनंती :हाहा:)
तुकड्यांना हळद, मसाला, मिठ चोळून घ्या.  आल-लसुण वाटण चोळा व एकत्र करुन वेळ असल्यास मुरवत ठेवा.


तवा मिडीयम फ्लेम वर ठेउन चांगला तापल्यावर त्यात तेल सोडा व त्यात तुकड्या तळण्यासाठी सोडा. पाच ते सात मिनिटे पहिली बाजू शिजून पलटा गरज वाटल्यास पलटल्यावर थोडे तेल साईडने सोडा. दुसरी बाजूही साधारण तेवढाच वेळ शिजवून घ्या.

(हे तेल जरा माझ्या हातून जास्तच पडले आहे. एवढ्या तेलाची गरज नसते. )
ह्या आहेत तयार चमचमीत, रुचकर पिळसा च्या तुकड्या.

Wednesday, 18 July 2018

सुरमई (फ्राय)

सुरमई ही मत्स्यप्रेमींची लाडकीच. त्यामुळे ही अर्थात कोळणींचीही लाडकीच. स्वस्त भावात सोडायला त्या तयार नसतात. 

सुरमई खात्री पुर्वक घ्यावी. कारण सुरमईच्या नावाखाली कुपा हा मासाही कोळणी खपवतात. कुपा माश्याला सुरमईची चव नसते. फक्त दिसायला साधारण तसाच असतो. सुरमई ही चकचकीत असुन छोट्या सुरमईच्या कातडीवर काळपट ठिपके असतात बाजुने तर मोठया सुरमई वरील फोटोत दाखवल्या प्रमाणे.




साहित्य :

सुरमईच्या ४-५ तुकड्या
चिमुटभर हिंग
हळद अर्धा चमचा चमचा
मसाला १ ते २ चमचे (तिखटाच्या आवडीवर)
मिठ अंदाजे
तळण्यासाठी तेल 

पाककृती :

१) सुरमईच्या तुकड्या स्वच्छ धुवुन घ्या.


२) तुकड्यांना हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन घ्या.


३) पॅन गरम करुन त्यात तेल चांगले गरम करा. गॅस मिडीयम ठेवा व त्यात तुकड्या सोडून द्या.



४) तुकड्या पातळ असतील तर ३-४ मिनीटे आणि जर जाड्या असतील तर मंद पेक्षा थोडा मोठा गॅस ठेउन ५-६ मिनीटे एक बाजु शिजवुन पलटून तेवढाच वेळ ठेवून गॅस बंद करावा. अगदीच रहावले नाही तर एक तुकडा जेवायच्या अधी मोडून खायला सुरमईची काहीच हरकत नसते




टिपा :

सुरमईचे कालवण इतर कालवणांसारखेच करतात.

तळताना तुमच्या आवडीनुसार आल-लसुण वाटण, लिंबु पिळून लावू शकता.

Thursday, 12 July 2018

माकुल चिली


साहित्य :

नळ (पाईप्) माखुल
आल, लसुण, पेस्ट १ चमचा
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
१ ते दोन चमचे मसाला किंवा अर्धा चमचा मिरची पुड
२-३ पाकळ्या ठेचलेला लसुण
१ मोठा कांदा चिरुन
१ सिमला मिरची कापून तुकडे करून
थोडी चिरलेली कोथिंबीर
थोडिशी चिंच
चविनुसार मिठ
२ चमचे तेल.

माकुल साफ करणे म्हणजे थोडे कठीणच काम असते. माखली दोन प्रकारच्या असतात नळ माखली आणि सर्‍या किंवा मणेर माखली. ही आहे नळ माखली. हिच्या वरती पातळशी साल असते ती काढून टाकायची म्हणजे लवकर शिजण्यास मदत होते. ही साल काढल्यावर अगदी शहाळ्यासारखी माखले दिसु लागतात. 

ह्याचे डोके आणि शरीर हाताने सहज वेगळे होते. ते वेगळे करुन घ्यायचे. मग त्याच्या डोक्याच्या भागाला चिकटून काळसर भाग येतो तो काढुन टाकायचा आणि बाकीचा डोक्याचा चांगला भाग, शेपट्या आणि मांसल भाग घ्यायचा.  ( हे काम शक्यतो कोळणीवरच सोपवायचे) खालच्य रेसिपी साठी आपल्याला फक्त रींग्ज घ्यायाच्य आहेत.  

नळ  माखल्या साफ करुन त्या गोल कापा. त्या आधीच पाईपप्रमाणे असल्यामुळे गोल कापयला जास्त कलाकुसर करावी लागत नाहीत. म्हणजे व्हेज मधल्या पडवळासारखे.

पाककृती :

१. नळ माखळीच्या थोड्या रिंग्ज धुवून त्याला आल-लसुण पेस्ट लावून वेळ असल्यास थोडे मुरवुन किंवा डायरेक्ट कुकरला १० ते १५ मिनीटे शिजवून घ्या.

२. एका भांड्यात तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजवा.

३. आता त्यात हिंग, हळद, मसाला हे जिन्नस घालून थोडे परतवा आणि लगेच त्यात शिजलेल्या माकुळच्या रिंग्ज आणि सिमला मिरची घालून, मिठ घालून चांगले परतवा.


४. लगेच थोडा चिंचेचा कोळ घाला आणि त्यावर कोथिंबीर घालून परतवा. २-३ मिनीटे परतवून लगेच गॅस बंद करा.



ही डिश स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता व मेन कोर्स म्हणूनही घेऊ शकता.

टिपा:

चिंचे ऐवजी लिंबू वापरू शकता.
आवडत असल्यास थोडा गरम मसाला वापरू शकता.

Wednesday, 11 July 2018

तळलेले पापलेट






ताजे पापलेट ओळखण्यासाठी ते कडक आहेत का बघा. तसेच त्यांच्यावर सुरकुत्या पडलेल्या नसल्या पाहीजेत.




साहित्य:
पापलेट
हळद
मसाला
मिठ
आल-लसुण्-मिरची-कोथिंबीर वाटण (ऑप्शनल)
तळण्यासाठी तेल

पाककृती:
पापलेट जर अगदीच मोठे असतील तर त्याच्या तुकड्या करुन घ्या. मिडीयम असतील आणि कमी जणांसाठी हवे असतील तर पापलेटचे शेपुट, बाजूची परे कापा. डोके आणि पोटाच्या मध्ये चिर देउन पोटातील घाण काढुन टाका आता त्या पापलेटच्या पोटांना वरुन चिरा द्या आणि मासे  धुवून घ्या. 


पापलेटांना वाटण, हळद, मसाला, मिठ लावुन थोडावेळ मुरवा.

आता तवा गॅसवर ठेवा आणि चांगला तापू द्या. जर तवा चांगला तापला नसेल तर तुकड्या चिकटतात. तापलेल्या तव्यावर तेल सोडा ते कालथ्याने पसरवा आणि त्यावर पापलेट शॅलोफ्राय करण्यासाठी सोडा.


४-५ मिनीटांनी पलटा, पुन्हा ५ मिनिटे शिजवून  गॅस बंद करा.  शिजवता गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा कमी ठेवा.

झाले तयार पापलेट. वास सुटलाय बघा.

Thursday, 21 June 2018

कोलंबीचे सुके व तळलेली कोलंबी



कोलंबी म्हणजे सगळ्यांच्याच परिचयाची. लहान मुलांसाठी तर अगदी आवडीचीच. कोलंबी आवडत नाही अशी मांसाहार करणार्‍या व्यक्तिमध्ये फार क्वचीत व्यक्ती आढळतील.

कोलंबीमध्येही काही प्रकार असतात. लाल कोलंबी, पांढरी कोलंबी, करपाली नावाने ओळखल्या जाणार्‍या कोलंब्या. ह्या काळ्या रंगाच्या असतात.

लाल कोलंबी


सफेद कोलंबी



करपाली/टायगर  प्रॉन्स


आज आपण  कोलंबीचे सुके व कोलंबी फ्रायची रेसिपी पाहुया. 

कोलंबीचे सुके
कोलंबी
२ मोठे कांदे
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
२ चमचे आल्,लसुण,मिरची, कोथिंबीर पेस्ट
हिंग, हळद
आग्री मसाला किंवा मालवणी मसाला
मिठ
तेल
कोकम किंवा टोमॅटो किंवा कैरी

पाककृती: 

१)जर कोलंबी सुकी करायची असेल आणि कोलंबी एकदम ताजी असेल तर तिला न सोलता फक्त शेपटी आणि टोक्याचा थोडा भाग काढुन मधले पाय काढायचे व कोलंबी स्वच्छ धुवुन घ्या.

२) धुतलेल्या कोलंबीला आल-लसुण्-मिरची-कोथिंबिरच वाटण चोळा. थोडी मुरवलीत तर अजुन छान.

३) भांड्यात तेल करम करुन लसुण पाकळ्यांची फोडणी देउन त्यावर कांदा गुलाबी रंग येईपर्यंत तळा.


४) कांदा बदामी रंगाचा झाला की त्यावर हिंग, हळद, मसाला टाकून  थोडे परतवा.

५) आता ह्यावर कोलंबी घालून ती परतवा.



६) नंतर भांड्यावर झाकण ठेउन झाकणावर पाणी ठेउन मिडीयम गॅसवर कोलंबी शिजु द्या. मधुन मधुन ढवळा.

७) थोड्या वेळाने झाकण काढून त्यात कैरी/कोकम व मिठ टाका आणि परतवा.

८) परत झाकण ठेउन वाफ येउ द्या. ५ मिनीटांत कोलंबी तयार. कशी दिसतेय ? घाबरु नका लाल रंग दिसतोय तेवढी ती तिखट नाही.



तळलेली कोलंबी 
कोलंबी
आग्री मसाला किंवा मालवणी मसाला
मिठ,
हळद
आल-लसुण पेस्ट (ऑप्शनल किंवा जर साल काढली असतील तर तेंव्हा चांगली लागते)
तेल
पाककृती: 
१) कोलंबीची साले काढा किंवा वरील प्रमाणे ठेवा.

२) सोललेल्या कोलंबीला मिठ, मसाला, हळद, आल-लसुण पेस्ट लावा वेळ असेल तर थोडी मुरु द्या.

३) तवा गरम करुन त्यावर तेल सोडून कोलंबी शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवा.

४) कोलंबी शिजायला थोडा वेळ लागतो म्हणुन गॅस मिडीयम पेक्षा कमी ठेउन चांगली शिजु द्या. ७-८ मिनीटांनी पलटुन गरज वाटल्यास थोड तेल टाकुन परत शिजवुन गॅस बंद करा.




कोलंबीचे कालवणही टेस्टी होते. त्यातही कांदा घालावा लागतो. वाटण ऑप्शनल असते. पुरवढ्यासाठी कालवणात बटाटा, दुधी,लाल भोपळा, सुरण, शेवग्याच्या शेंगा टाकतात.

कोलंबीची भजी, मसाला कोलंबी, कोलंबीचे दबदबीत, कोलंबीचे पॅटीस, कोलंबी पुलाव आणि अजून बरेच प्रकार कोलंबी पासून करता येतात.

जर कोलंबी जास्त जाड असेल आणि सोलली असेल तर त्यातील काळा धागाही काढतात. साला सकट कोलंबी जास्त रुचकर लागते. खाताना तिचे साल चावण्यात मजा येते.

कोलंबी जास्त प्रमाणातही खाऊ नये बाधण्याची शक्यता असते. पथ्यात कोलंबी वर्ज्य असते.

Tuesday, 19 June 2018

चिंबोरे (खेकडे)





चिंबोर्‍यां मध्ये बरेच प्रकार आहेत. समुद्रातील चिंबोरे, शेतातील चिंबोरे, खाडितील खेकडे, डोंगरातील मुठे हे काळे कुळकुळीत असतात. समुद्रात तर बरेच प्रकारचे चिंबोरे मिळतात अगदी रंगित सुद्धा. ह्या चिंबोर्‍यांमध्ये कॅल्शियम भरपुर असत. हे गरमही असतात. काही जणांना अ‍ॅलर्जी असते चिंबोर्‍यांची. पण लहान मुलांना जेवणात चिंबोरे म्हणजे मेजवानीच. जर जेवणात चिंबोरा असेल तर १ तास तरी जेवणाला लागतोच. शिवाय ताटात हा पसारा होउन दोन हात खाण्यासाठी वापरावे लागतातच.

चिंबोर्‍यांचे अजुन सुप, सुके करता येते. तसेच पिठ भरुन कालवणही करतात.

चिंबोर्‍या घेताना कडक बघुन घ्यायच्या. जर चिंबोरे दाबल्यावर आत जात असतील तर ते पोकळ असतात. भरलेल्या चिंबोर्‍यांमध्ये लाख (गाबोळी मिळते) ती मिळाली म्हणजे पर्वणीच.

नर व मादी चिंबोरा.



दिवाळीच्या आसपास खाडीत तसेच खाडीलगतच्या शेतात छोटी छोटी चिंबोरी मिळतात त्यांना पेंदुरल्या म्हणतात. ह्या पेंदुरल्या आतमध्ये पुर्ण लाखेने भरलेल्या असतात. लाख म्हणजे ह्यांची गाबोळी.


साहित्य


४-५ खेकडे
आल लसुण पेस्ट १ चमचा
मिरची, कोथिंबीर पेस्ट १ चमचा
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
एक मोठा कांदा
२ चमचे मसाला (आग्री किंवा मालवणी)
हिंग, हळद
चविपुरते मिठ
थोडा चिंचेचा कोळ
वाटण : १ कांदा व पाव वाटी सुके खोबरे किसुन भाजुन वाटावे
१ चमचा गरम मसाला.
थोडी कोथिंबिर
तेल



पाककृती:


चिंबोरे साफ करुन घ्यावे. साफ करुन म्हणजे चिंबोरीचे दोन मोठे नांगे काढुन घ्यायचे, बाकीच्या नांग्यांचे वाटुन गाललेले पाणि घ्यायचे त्यामुळे रश्शाला दाटपणा येतो पण हे ऑप्शनल आहे. नंतर चिंबोरे मधुन कापुन त्यातील काळी पिशवी काढून टाकायची. जर चिंबोरे छोटे असतील तर आख्खे टाकले तरी चालतील.

भांड्यात तेल टाकुन लसणाची फोडणी द्यायची. मग त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळावा. आता त्यात आल, लसुण पेस्ट टाकुन हिंग हळद, मसाला, चिंबोरे, मोठे नांगे टाकुन चिंबोरे बुडतील एवढ पाणी टाकायच. आता १० मिनीटे उकळू द्याव मग त्यात गरम मसाला, चिंचेचा कोळ, मिठ, कोथिंबीर टाकुन थोडा वेळ उकळवुन गॅस बंद करावा. चिंबोरे शिजण्यास थोडा वेळ लागतो म्हणुन मिडीयम गॅसवर १५ मिनीटेतरी शिजु द्यावे.





Thursday, 14 June 2018

खेंगट



पावसाची सुरुवात झाली की वेध लागतात ते खेंगटाचे. मांदेली, बोंबील आणि कोलंबी ह्याचा एकत्र वाटा. मासे पकडणार्‍यांच्या जाळ्यात हे मासे एकत्र येतात ते न निवडता म्हणजे वेगवेगळे न करता पुर्वी वाटे करायचे त्याला खेंगट म्हणतात. ह्यात इतर मासे जसे कालेट, ढोमा, बांगडा, खेकडे असे छोटे मासे पण येतात पण ते काढून टाकायचे. पुर्वी स्वस्त व मस्त अगदी गरिबांनाही परवडेल अस हे खेंगट असायच. पावसाळ्यात हे खेंगट भरपुर येत आणि अगदी ताज-तवान येत. पण हल्ली खुप कमी असे एकत्र खेंगटाचे वाटे येतात. कारण हल्ली कोळणी मासे निवडून वेगवेगळे विकायला ठेवतात. त्यामुळे कधी कधी खेंगट करायचे म्हटले तर तिघांचे वेगवेगळे वाटे घ्यायचे आणि एकत्र करायचे.

खेंगट १ ते २ वाटे
लसुण एक गड्डा ठेचुन
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
२ चमचे रोजच्या वापरातील लाल मसाला/ आग्री मसाला किंवा मालवणी मसाला
पाव वाटी तेल
पाउण वाटी चिंचेचा कोळ
मिठ गरजे नुसार
२ हिरव्या मिरच्या मोडून
थोडी कोथिंबीर चिरुन

खेंगटातील बोंबील, मांदेली आणी कोलंबी साफ करुन घ्या. इतर मासे असतील तर काढून टाका.


खेंगट करण्याचे दोन प्रकार आहेत एकात माश्यावर वरील साहित्यातील सगळे जिन्नस अगदी तेलासकट मिक्स करायचे. उकळी आल्यावर ५ मिनीटे मिडीयम गॅसवर शिजवायचे. झाले खेंगटचे कालवण तैयार.

दुसरी पद्धत.
भांड्यात तेल चांगले गरम करायचे. त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी द्यायची. त्यावर हिंग, हळद, मसाला घालून लगेच खेंगट घालून त्यावर चिंचेचा कोळ घालायचा. मिठ घालायचे. मग उकळी आली की त्यावर मोडलेल्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून ३-४ मिनीटांत गॅस बंद करायचा.

अधिक टिपा:


अप्रतिम चव असते खेंगटाची. अगदी रोज खाल्ला तरी कंटाळा येत नाही.

ह्यात जास्त पाणी घालायचे नाही कारण बोंबील आणि कोलंबीला पाणी सुटते. शिवाय चिंचेच्या दाट कोळातच ह्याची मजा असते.

खेंगट शेजवताना गॅस नेहमी मिडीयम ठेवायचा. नाहीतर बोंबील गळून पडतात. मांदेलीचे तुकडे होतात.

Tuesday, 12 June 2018

चिवने/चिवणे

चिवनी/चिवणे हे मासे सुरवातीचा जोरदार पाऊस (उधाण) पडून जेव्हा पाणी विरा-नाल्यातून वाहू लागते तेव्हा येतात. ही चिवनी ह्या दिवसात गबोळीने भरलेली असतात. उधाण आल्यावर अंडी घालण्यासाठी ही वर आलेली असतात. म्हणून ह्यांना उधवणीची चिवनी म्हणतात. ही समुद्रातून वाहत खाडीत, विर्‍यात/नाल्यात शेतात जातात. ह्या दिवसात हे चिवने पकडण्यासाठी सगळे मच्छीप्रेमी आसू, जाळ घेऊन जागोजागी दिसतात. उधवणीच्या दिवसांतच ह्यात गाबोळी असते. नंतर ह्या माश्यांना खास चव नसते.


चिवनी साफ करण्यासाठी राखाडी घ्यावी लागते. ती नसेल तर तांदळाचे पीठ थोडे थोडे बोटांना लावून साफ करावी लागतात. कारण ती बुळबुळीत असतात. हातात घेतल्यावर हातातून सटकतात. ह्यांच्या पाठीवर एक टणक काटा असतो तो राखाडी हातात घेऊन मोडतात.

काटा वगैरे काढता येत नसेल तर सरळ डोके काढायचे. तसाही ह्या माशांचा डोक्याकडचा भाग खाल्ला जात नाही.



ह्याचे कालवण दोन प्रकारे केले जाते. एक डायरेक्ट सगळे जिन्नस एकत्र करून आणि एक फोडणी देऊन.


५-६ चिवनी


फोडणीसाठी तेल


१ गड्डा लसूण पाकळ्या ठेचून,


हिंग


हळद,


मसाला २ चमचे


लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ


चवीपुरते मीठ


१ हिरवी मिरची


थोडी चिरलेली कोथिंबीर.



प्रकार १


भांड्यात तेलावर लसूण फोडणीला टाकून हिंग, हळद, मसाला घालावा. चिवनी व चिंचेचा कोळ टाकावा. थोडे पाणी घालावे. मीठ घालावे व चिरलेली कोथिंबीर घालूनमिरची मोडून घालावी. उकळी आली की ५ मिनिटे शिजवून गॅस बंद करावा.


प्रकार 2


ह्या प्रकारात सर्व जिन्नस चिवण्यांमध्ये एकत्र करावे व उकळी आल्यावर पाच मिनिटे शिजवावे.





टिपा :


काही वेळा चिवन्यांया मांसाला रॉकेल सारखा वास येतो. पण गाबोळीला येत नाही.