Tuesday, 12 June 2018

चिवने/चिवणे

चिवनी/चिवणे हे मासे सुरवातीचा जोरदार पाऊस (उधाण) पडून जेव्हा पाणी विरा-नाल्यातून वाहू लागते तेव्हा येतात. ही चिवनी ह्या दिवसात गबोळीने भरलेली असतात. उधाण आल्यावर अंडी घालण्यासाठी ही वर आलेली असतात. म्हणून ह्यांना उधवणीची चिवनी म्हणतात. ही समुद्रातून वाहत खाडीत, विर्‍यात/नाल्यात शेतात जातात. ह्या दिवसात हे चिवने पकडण्यासाठी सगळे मच्छीप्रेमी आसू, जाळ घेऊन जागोजागी दिसतात. उधवणीच्या दिवसांतच ह्यात गाबोळी असते. नंतर ह्या माश्यांना खास चव नसते.


चिवनी साफ करण्यासाठी राखाडी घ्यावी लागते. ती नसेल तर तांदळाचे पीठ थोडे थोडे बोटांना लावून साफ करावी लागतात. कारण ती बुळबुळीत असतात. हातात घेतल्यावर हातातून सटकतात. ह्यांच्या पाठीवर एक टणक काटा असतो तो राखाडी हातात घेऊन मोडतात.

काटा वगैरे काढता येत नसेल तर सरळ डोके काढायचे. तसाही ह्या माशांचा डोक्याकडचा भाग खाल्ला जात नाही.



ह्याचे कालवण दोन प्रकारे केले जाते. एक डायरेक्ट सगळे जिन्नस एकत्र करून आणि एक फोडणी देऊन.


५-६ चिवनी


फोडणीसाठी तेल


१ गड्डा लसूण पाकळ्या ठेचून,


हिंग


हळद,


मसाला २ चमचे


लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ


चवीपुरते मीठ


१ हिरवी मिरची


थोडी चिरलेली कोथिंबीर.



प्रकार १


भांड्यात तेलावर लसूण फोडणीला टाकून हिंग, हळद, मसाला घालावा. चिवनी व चिंचेचा कोळ टाकावा. थोडे पाणी घालावे. मीठ घालावे व चिरलेली कोथिंबीर घालूनमिरची मोडून घालावी. उकळी आली की ५ मिनिटे शिजवून गॅस बंद करावा.


प्रकार 2


ह्या प्रकारात सर्व जिन्नस चिवण्यांमध्ये एकत्र करावे व उकळी आल्यावर पाच मिनिटे शिजवावे.





टिपा :


काही वेळा चिवन्यांया मांसाला रॉकेल सारखा वास येतो. पण गाबोळीला येत नाही.



No comments: