Showing posts with label पालेभाज्या. Show all posts
Showing posts with label पालेभाज्या. Show all posts

Tuesday, 7 July 2020

तालिमखाना/कोकीलाक्षा रानभाजीच्या वड्या

माझ्या आधिच्या लेखामध्ये तालिमखाना बद्दल मी लिहीले आहे व भाजीची रेसिपीही दिली आहे.

https://gavranmejvani.blogspot.com/2020/06/blog-post.html?m=1

पण भाजी म्हटल की कंटाळत खातात सगळे त्यात लहान मुले तर हातच लावत नाहीत. म्हणुन या पावसाळ्यात रानभाज्या वेगवेगळ्या प्रकारात करायच ठरवल आणि त्यातून तयार झाली खमंग, खुसखुशीत तालिमखान्याची वडी. चला तर मग रेसिपी पाहुया.

तालिमखान्याची कोवळी भाजी घ्या.


ही  धुवून त्याची पाने काढा.


आता खालील साहित्य घ्या.
चिरलरली तालिम खान्याची पाने
१ वाटी बेसन
आल,लसुण,मिरची, कोथींबीर पेस्ट १ मोठा चमचा
चिमटीभर हिंग
एक चमचा हळद
१ किंवा दोन चमचे लाल तिखट
अर्धा चमचा जिरे पूड
१ चमचा धणे पूड
मिठ
अर्ध्या लिंबाचा रस
तेल




तेल सोडून वरील सर्व जिन्नस एकत्र करा



हळू हळू मावेल इतक पाणी घालून. एकजीव करुन घ्या. जास्त घट्ट नको आणि पातळही नको.


आता हे वाफवायच . मोदक पात्र किंवा मोठ्या पातेल्यात पाणी ठेउन त्यात. अस ताट किंवा भांड ठेउन हे वाफवता येईल. ज्यात वाफवणार आहात त्या भांड्याला तेल लावा आणि वरील मिश्रण भांड्यात पसरवून एका लेव्हलला लावा आणि अर्धा तास मध्यम आचेवर वाफवून घ्या.

वाफवून झाल की जरा थंड होउद्या मग सुरीने त्याच्या वड्या पाडा.


तवा गरम करुन त्यात तेल घालून या वड्या शॅलोफ्राय करा आणि सर्व्ह करा आणि मस्त आस्वाद घ्या. या वड्या चविलाही चान लागतात आणि खुसखुशीतही होतात.

 टीप
खुसखुशीतपणा येण्यासाठी पाव वाटी तांदळाचे पीठ मिश्रणात मिसळा. रानभाजीच्या वड्या आहेत हे वाटतच नाही खाताना. टेस्टी होतात.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे.

Tuesday, 24 July 2018

भारंगीची वाल घालून भाजी




भारंगीचे झाड असते. पावसाळ्यात ह्या झाडाला छान कोवळी हिरवी पाने येतात त्याची भाजी करतात. 

हि भारंगीची फुले 

साहित्य : 
भारंगीच्या पानांना थोडा उग्र वास असतो. त्यामुळे ती आधी चिरून  पाण्यात एक उकळी काढून पिळून घेतात. 
मुके वाल म्हणजे   रात्री  भिजत घालून सकाळी भाजी करायला तयार असणारे मोड न आलेले वाल उकडून शिजवून घ्यावेत.  
२ कांदे
४-५ लसूण पाकळ्या
२-३ मिरच्या
हिंग
हळद
चविपुरते मिठ
पाव वाटी ओल खोबर किसुन
फोडणीसाठी तेल



पाककृती 

भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूणाची फोडणी देऊन मिरची व कांदा परतावा.

त्यावर हिंग व हळद घालून परतावे.




आता ह्यावर भारंगीची भाजी व  शिजवलेले वाल घालावेत. 



आता झाकण ठेऊन थोडावेळ शिजू दया व नंतर परता. 


आता मीठ व खोबरे घाला. आवडत असल्यास थोडी साखर घाला म्हणजे थोडी  चव येते. 

झाली भाजी तयार. 


अधिक टिपा :
भाजी अशीच   उकळून पिळून घ्यावी लागते नाहितर उग्र व कडवट लागते.  
ह्या भाजीत कोलंबी,  सुकट घालुनही  करता येते. 
वाल न घालताही साधी करता येते तसेच डाळी घालूनही करता येते.         


Wednesday, 4 July 2018

तालिमखाना



* कोणतीही रानभाजी ओळख पटल्याशिवाय घेउ नका.
साधारण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ओसाड जागी रानात निळ्या रंगाची फुले फुललेली काटेरी झाडे दिसतात ती म्हणजे तालिमखाना. उन्हाळयात ह्यांचे बी तयार होते व खाली पडून ते पावसाळ्यात उगवते. उगवल्यावर त्याला काटे येण्याच्या आधी जे कोवळे कोंब असतात त्याची भाजी करतात. मिळालेल्या माहीती नुसार ही भाजी औषधी आहे. ह्याच्या बियांचीही पेज, लाडू करतात. बिया शक्तीवर्धक असतात.

ही अशी कोवळी असतानाच भाजी  करायला घ्यावी.



तालिमखानाची भाजी
२ कांदे
४-५ लसूण पाकळ्या
२-३ मिरच्या
हिंग
हळद
चविपुरते मिठ
पाव वाटी ओल खोबर किसुन
फोडणीसाठी तेल





तालिमखानाची भाजी स्वच्छ धुवुन चिरुन घ्यावी.

भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूणाची फोडणी देऊन मिरची व कांदा परतावा.

त्यावर हिंग व हळद घालून परतावे.

आता त्यावर  चिरलेली भाजी घालावी व  दोन  तीन मिनीटे झाकण  ठेवावे म्हणजे भाजी आकसून व्यवस्थित  ढवळता येते. 

चार-पाच मिनीटे शिजली की त्यावर मिठ घालून परता. मग ओल खोबर घाला आणि परता.

ही झाली तयार भाजी.




 टिप: 
भाजीची चव अजून बदलण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी त्यात टोमॅटो, साखर डाळी घालता येईल.

Wednesday, 27 June 2018

वालाची पालेभाजी



वालाची पालेभाजी सहसा बाजारात मिळत नाही. उन्हाळ्यात जेंव्हा आपण साठविण्यासाठी वाल घेतो तेंव्हा त्यातील किडके वाल बाजूला काढतो. हेच किडके वाल न टाकता बाजूला ठेऊन आपल्याला हवे तेंव्हा कुंडीत किंवा जमिनीवर पेरायचे. त्याला मोड येऊन दोन पाने मोठी आली की ही भाजी काढायची. भाजी हवी असल्यास चांगले वालही पेरू शकता. साधारण ८-१० दिवसांत भाजी काढण्यासाठी तयार होते. पण शक्यतो तिसरे पान यायच्या आत काढायची नाहीतर पाने जून होतात.

साहित्य :
 
वालाची पालेभाजी
दोन मोठे कांदे चिरुन
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
५-६ लसुण पाकळ्या ठेचुन
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
चवीनुसार मिठ आणि साखर
पाव वाटी तेल
मुठभर ओल खोबर


 हया भाजीची पाने चिरुन घ्या. थोडासा देठाचा कोवळा भाग घेतला तरी चालतो.
भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यावर लसुण पाकळ्यांची फोडणी द्या. लसुण जरा लालसर होऊ द्या म्हणजे चांगला वास येतो. त्यावर मिरची व कांदा घालून परता. वरून हिंग व हळद घालून कांदा परता.
कांदा शिजवायची गरज नसते पालेभाजीला. लगेच चिरलेली भाजी घालून परता.
आता भाजीवर झाकण द्या आणि ५ मिनिटे मिडीयम गॅसवर शिजू द्या. भाजी शिजली की त्यावर मिठ, साखर घाला आणि ढवळून वरून खोबरे घाला व परता.


पुन्हा एकदा झाकण ठेऊन २-३ मिनीटे ठेवा वाफ येण्यापुरती व गॅस बंद करा.

ही आहे तय्यार वालाची पालेभाजी.

अशा प्रकार मुग, मटकीचीही पालेभाजी करता येते.