Tuesday, 7 July 2020

तालिमखाना/कोकीलाक्षा रानभाजीच्या वड्या

माझ्या आधिच्या लेखामध्ये तालिमखाना बद्दल मी लिहीले आहे व भाजीची रेसिपीही दिली आहे.

https://gavranmejvani.blogspot.com/2020/06/blog-post.html?m=1

पण भाजी म्हटल की कंटाळत खातात सगळे त्यात लहान मुले तर हातच लावत नाहीत. म्हणुन या पावसाळ्यात रानभाज्या वेगवेगळ्या प्रकारात करायच ठरवल आणि त्यातून तयार झाली खमंग, खुसखुशीत तालिमखान्याची वडी. चला तर मग रेसिपी पाहुया.

तालिमखान्याची कोवळी भाजी घ्या.


ही  धुवून त्याची पाने काढा.


आता खालील साहित्य घ्या.
चिरलरली तालिम खान्याची पाने
१ वाटी बेसन
आल,लसुण,मिरची, कोथींबीर पेस्ट १ मोठा चमचा
चिमटीभर हिंग
एक चमचा हळद
१ किंवा दोन चमचे लाल तिखट
अर्धा चमचा जिरे पूड
१ चमचा धणे पूड
मिठ
अर्ध्या लिंबाचा रस
तेल




तेल सोडून वरील सर्व जिन्नस एकत्र करा



हळू हळू मावेल इतक पाणी घालून. एकजीव करुन घ्या. जास्त घट्ट नको आणि पातळही नको.


आता हे वाफवायच . मोदक पात्र किंवा मोठ्या पातेल्यात पाणी ठेउन त्यात. अस ताट किंवा भांड ठेउन हे वाफवता येईल. ज्यात वाफवणार आहात त्या भांड्याला तेल लावा आणि वरील मिश्रण भांड्यात पसरवून एका लेव्हलला लावा आणि अर्धा तास मध्यम आचेवर वाफवून घ्या.

वाफवून झाल की जरा थंड होउद्या मग सुरीने त्याच्या वड्या पाडा.


तवा गरम करुन त्यात तेल घालून या वड्या शॅलोफ्राय करा आणि सर्व्ह करा आणि मस्त आस्वाद घ्या. या वड्या चविलाही चान लागतात आणि खुसखुशीतही होतात.

 टीप
खुसखुशीतपणा येण्यासाठी पाव वाटी तांदळाचे पीठ मिश्रणात मिसळा. रानभाजीच्या वड्या आहेत हे वाटतच नाही खाताना. टेस्टी होतात.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे.

Friday, 26 June 2020

तालिमखाना

माझ्या  बालपणी उरण नागावात रहात असलेल्या आमच्या घराच्या समोरच आमच एक मोठं शेत होत. शेताला लागूनच गावचा मुख्य रस्ता अाणि रस्त्याच्या पलिकडे पावसाचे पाणी वाहून नेणारा मोठा विरा (नाला) होता. पावसात विरा पूर्ण भरुन त्याचे पाणी रस्त्यावर येउन आमच्या ह्या शेतात यायच. अती पाण्याच्या ओढ्यामुळे हे शेत आम्हाला  वापरता येत नसे व ते तसेच बिन लागवडीच रहायच. पण हे बिनलागवडीच शेत मला प्रचंड आवडायच याच कारण त्यात चिवणे मासे यायचे आणि त्या माशांना अचुक नेमाने टिपून आस्वाद घेण्यासाठी बगळे यायचे आणि आमच्या घराच्या बाजूलाच असलेल्या चिंचेच्या झाडावर दर पावसाळ्यात हे बगळे आमच्या घराच्या शेजारी असलेल्या चिंचेच्या झाडावर काड्यांची घरटी करुन वस्ती करुन रहायचे. समोरच्या  घरांत लाडाने पाळलेली बदके या शेतात पोहायला येत ती तरंगती  पहाताना खुप गंमत वाटायची. शांत रात्रीला शेतातील बेकांची डराव डराव वेगळच वातावरण निर्मिती करायची. दिवसा शेत माझ्यासाठी तळं असायच.  पाण वनस्पतीही शेतात उगवायच्या साधारण आॅगस्ट मध्ये पावसाचा जोर कमी झाला की पाणी शेतातील पाणी कमी व्हायच आणि हळु हळु तळ गाठायच तेव्हा या शेतात हिरवी गर्द रोपे उगवायला सुरुवात व्हायची आणि पहाता पहाता सप्टेंबर आॅक्टोबर मध्ये एकाच आकारात आणि उंचीत उंच खोडाला गोलाकार काही अंतरावर झुबक्याने लांबलचक, टोकदार  काटे असलेले हिरवेगार जंगल शेतात तयार व्हायचे. ही झुडपे सुचिपर्णी वृक्षाप्रमाणे  अशी दिसायची की जणू काश्मिरच जंगलच . आम्ही याला काश्मिरच म्हणायचॊ. थोड्या दिवसांनी या झुडुपांना मन मोहून टाकणारी आकर्शक निळ्या रंगाची फुले लागायची तेव्हा तर स्वर्गात आल्यासारखच वाटायच.

शेत निळाईत न्हाउन निघायच.  ही स्वर्गिय रुपाची झाडे होती तालिमखान्याची. पण तेव्हा मला तालिमखाना हे नाव माहित नव्हते ते आता नेटवर्कच्या जमान्यामुळे कळले. ह्यालाच कोकिलाक्ष असेही नाव आहे.  तेव्हा आमच्याकडे याला शुद्ध भाषेत कोरंटी आणि गावठी भाषेत कोलेटाची झाड म्हणायचे. त्यावेळी गज-यांची सगळ्याच बायकांना हौस असायची आमच्याइथल्या काही बायका रोज या तालिमखान्याच्या कळ्या काढायला यायच्या. अहो सुंदर गज-यापुढे काट्याकुट्यांची तमा कुणाला! फिरकीचे सुंदर गजरे करुन बायका मुली यांचे गजरे आपल्या केसांत माळून केसांच सौंदर्य खुलवीत असत. मला तर फुलांची प्रचंड हौस मग मी कशी मागे पडणार. पण घुसायचे त्या काटेरी झुडपांत आणि कळ्या काढत बसायचे. काटे टोचायचे बोटांना पण उटोचण्याला फुलांचा सहवास फुंकर घालून मन उल्हासित करत असे. याच्या फुलांध्ये मध असते. चाळा म्हणुन मधुन मधुन ती ही  मुले फुलातुन ओढायचो. उन्हाळा आला की ही झाडे सुकुन जायची. मग काही बायका याच्या बिया काढायला यायच्या. त्यांच्या बोलण्यातून समजल की या बियांची पेज करतात ती शक्तीवर्धक असते व पुरुषांसाठी ती जास्त लाभदायक असते. बियांचे लाडूही करतात. नंतर झाडे संपुर्ण सुकली की वडील शेत साफ करुन घ्यायचे. ती सुकलेली झाडे तोडून जाळून घ्यायचे पण असे केले तरी दर वर्षी ही रोपे बिया मातीत रुतून राहिल्याने स्वर्ग निर्माण करण्यासाठी नविन जन्म घ्यायचीच.

शेतातील पाण्यामुळे ही  ही शेतात उशीरा दिसत असली तरी पाऊस पडल्यावर काही दिवसातच आमच्या वाडीतील ओसाड जागेत ही वनस्पती आपल्या हिरव्या चमकदार पानांसह डोलू लागायची.  मागिल वर्माषाच्या मुळा-खोडातून आणि पडलेल्या बियांपासून तालिमखान्याचे नविन कोंब यायचे.  माझी आई हया तालिमखाना वनस्पतीचे कोवळे बोखे तोडून आणायची आणि  बनवायची. आईची ही आवडीची भाजी होती आणि औषधी म्हणुन ती दर वर्षी आवर्जून करुन घरात सगळ्यांना खायला लावायची. कंबर वर ही औषधी आहे अस ती अजूनही सांगते. नाविन्यपूर्ण म्हणुन मलाही ती आवडायची. विशेष म्हणजे आईसोबत ती ओळखून खुडण्यात मला जास्त मजा वाटायची. नविनच उगवते तेव्हा तिला काटे नसतात. कोवळी गुळगुलीत  व देठांना लव असतात. पानांना थोडा उग्र वास येतो.


आई तेव्हा टीप द्यायची काटे आले नसतील असेच बोखे तोडायचे म्हणजे काटेही रुपत नाहीत आणि कोवळी असल्याने चविलाही चांगली लागते. हळू हळु मला आई कडुन तिची रेसिपीही कळली. लग्न झाल्यावर सासरच्या आमच्या काही पडीक जागेत ही भाजॊ उगवते ती यायची मी वाटच पहात असते. ती उगवली की आईच्या रेसिपी प्रमाणे ही भाजी बनवते ती खालील प्रमाणे.

तालिमखानाची भाजी पाककृती
२ कांदे
४-५ लसूण पाकळ्या
२-३ मिरच्या
हिंग
हळद
चविपुरते मिठ
पाव वाटी ओल खोबर किसुन
फोडणीसाठी तेल





तालिमखानाची भाजी स्वच्छ धुवुन चिरुन घ्यावी.

भांड्यात तेल गरम करून त्यावर लसूणाची फोडणी देऊन मिरची व कांदा परतावा.

त्यावर हिंग व हळद घालून परतावे.

आता त्यावर  चिरलेली भाजी घालावी व  दोन  तीन मिनीटे झाकण  ठेवावे म्हणजे भाजी आकसून व्यवस्थित  ढवळता येते. 

चार-पाच मिनीटे शिजली की त्यावर मिठ घालून परता. मग ओल खोबर घाला आणि परता.

ही झाली तयार भाजी.




 टिप: 
भाजीची चव अजून बदलण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी त्यात टोमॅटो, साखर डाळी घालता येईल.

सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे

Friday, 2 August 2019

भरली कंटोळी



सध्या बाजारात चांगली रानातील कंटोळी येत आहेत. भाजी नेहमी करतो पण आता जरा तीच कंटोळी भरून अधीक रुचकर बनवूया.

साहित्यः
कंटोळी तीन-चार जुड्या किंवा पाव किलो
दोन मध्यम कांदे चिरून
अर्धा वाटी सुके खोबरे किसून
१ चमचा जीरं
२ चमचे धणे
२ चमचे तीळ
१ छोटा चमचा राई
१ चमचा हळद
१ चमचा मिरची पूड
१ चमचा गरम मसाला किंवा आवडत असेल तर गोडा मसाला
थोडी चिंच
चिंचेच्या प्रमाणात गुळ म्हणजे चव आंबट गोड मिक्स होईल अशी.
दोन-तीन चमचे ओलं खोबरं
तेल
मिठ

1) 
2)

3)



कृती
कंटोळी धुवून, देठ काढून त्याला मध्ये एका बाजूने चीर द्या व आतील बी सुरीच्या सहाय्याने काढून टाका.

4)


तव्यावर किंवा पॅनमध्ये कांदा, धणे, तीळ व सुके खोबरे खमंग भाजून घ्या व त्याचे मिक्सरमध्ये वाटण करा. वरील साहित्यातील तेल व मोहरी सोडून, चिंचेचा कोळ करून सगळे साहित्य एकत्र करा.

5)


आता हे मिश्रण कंटोळीमध्ये चांगल दाबून भरा.

6)


पॅनमध्ये तेल गरम करून राईची फोडणी द्या व त्यावर ही कंटोळी सोडा जर मिश्रण उरल असेल तर तेही तव्यात सोडा व शिजण्यासाठी थोडे पाणी टाकून झाकण ठेउन शिजूद्या.
7)


गॅस कमी फ्लेमवर ठेवा मध्ये मध्ये परतवा व २०-२५ मिनीटे शिजवून गॅस बंद करा.

८) ही भरली कंटोळी चपाती किंवा भाकरी सोबत छान लागतात.

Wednesday, 6 March 2019

चिकन लॉलिपॉप



साहित्य :

चिकनचे लॉलिपॉपसाठी लागणारे २० पीस
४ चमचे मैदा
२ चमचे कॉर्नफ्लोअर
आल-लसुण-मिरची-कोथिंबीर पेस्ट १ मोठा चमचा
१ अंड
३ चमचे सोया सॉस
१ चमचा मिरेपूड
१ चमचा मिरची पूड
चवीनुसार मिठ
तळण्यासाठी तेल
अ‍ॅल्युमिनियम फॉईलचे छोटे तुकडे (धरण्यासाठी)

पाककृती :


घरच्याघरी चिकन लॉलीपॉप बनवणे सोपे असते. चिकनवाल्याकडे लॉलीपॉपसाठी पिसेस हवेत सांगितल की तो बरोबर मांस वरच्या दिशेला ओढून आणि खाली हाड असे करून तुकडे करून देतो.
हे चिकनचे तुकडे आधी स्वच्छ धुवावेत.
ह्या तुकड्यांना वरच्या साहित्यातील तेल आणि अ‍ॅल्युमिनिअम फॉईल सोडून सगळे व्यवस्थित चोळून घ्यावे. साधारण एक तास तरी मुरु द्यावे.
आता कढईत तेल चांगले गरम करून मिडीयम गॅसवर हे तुकडे चांगले तळून घ्यावेत. गॅस मोठा ठेऊ नये त्यामुळे पीठ करपते. साधारण १०-१५ मिनीटे चांगले शीजू द्यावे आणि बाहेर काढून त्याच्या खालच्या हाडाला अ‍ॅल्युमिनीयम फॉईल पेपर गुंडाळुन सर्व्ह करावे.



अधिक टिपा:


लॉलिपॉप बनविण्याचा रेडीमेड मसालाही मिळतो. पण त्यापेक्षा घरी केलेला चांगला.
ह्यात रंग येण्यासाठी खायचा लाल रंग वापरतात पण मी वापरत नाही. त्या ऐवजी काश्मिरी मिरची पूड रंगाच काम करेल.

Tuesday, 15 January 2019

धाबा स्टाईल चिकन



नेहमीच पारंपारीक चिकनपासून थोड वेगळ काहीतरी करू म्हणून आंतरजालावर चिकनच्या प्रकाराचा शोध घेतला तेव्हा धाबा स्टाईल चिकन ची रेसिपी दिसली. मुळ रेसिपीत मला पटले ते बदल करून खालील रेसिपी केली आहे.

साहित्यः
१ किलो चिकन
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट २ मोठे चमचे
पाव वाटी दही
२ मोठे कांदे चिरुन
५-६ लसुण पाकळ्या ठेचून
हिंग पाव चमचा
हळद १ चमचा
२ -३ टोमॅटो मिस्करमध्ये फिरवून
२-३ मध्यम बटाटे मोठ्या फोडी करुन
लाल तिखट किंवा रोजच्या वापरातला मसाला ४-५ चमचे किंवा आपल्या आवडी नुसार
पाव वाटी बेसन (तव्यावर खमंग भाजून)
१ चमचा गरम मसाला
१ चमचा धणे पावडर
खडा मसाला ल३-४ दालचिनीचे तुकडे, ४-५ लवंगा, ७-८ काळी मिरी, १ मोठी वेलची (बडी वेलची किंवा काळी वेलची), १ जायपत्री, तमालपत्र ३-४
चविनुसार मिठ
फोडणीसाठी तेल

१)


२)


चिकनला आल, लसुण,मिरची कोथिंबीरची केलेली पेस्ट, दही आणि हिंग हळद चोळून ठेवा.
३)


भांड्यात तेल गरम करुन त्यावर लसुण फोडणीला देऊन, खडा मसाला घाला व कांदा घालून त्याला गुलाबी रंग येई पर्यंत परता. आता ह्यात टोमॅटोची प्युरी घाला आणि ढवळून घ्या.
४)


हिंग, हळद, मसाला, भाजलेल बेसन हे सगळ भांड्यातील मिश्रणावर टाका. व चांगले परतून घ्या.
५)


आता ह्यावर चिकन व बटाट्याच्या फोडी घाला आणि गरजेनुसार पाणी घालून शिजत ठेवा. बटाट्याच्या फोडी शिजल्या की चिकनही शिजत. चिकन शिजल की त्यात मिठ, धणा पावडर व गरम मसाला टाका आणि परतून पुन्हा एक वाफ येऊद्या.
६)


वरून थोडी कोथिंबीर पसरा. तर अशा प्रकारे तयार झाले धाबा स्टाईल चिकन .

७)
विषय:

Friday, 14 December 2018

इडली चिली



बर्‍याचदा आपल्या घरी केलेल्या ईडल्या उरतात. सारख्या त्याच खायला कंटाळा येतो (सगळ्यांनाच येतो असे नाही) म्हणून थोड्या वेगळेपणाने त्यांना संपविण्याचा एक चायनीज मार्ग.

इडलीचे तुकडे कापून
कांदा जरा जाडाच कापून घ्या
सिमला मिरचीचे तुकडे
आल-लसूण बारीक कापून



रेड चिली सॉस
ग्रिन चिली सॉस
टोमॅटो सॉस
सोया सॉस


चवीपुरते मिठ
तेल

कृती :
इडलीचे तुकडे तेलातून तळून घ्या. छान कुरकुरीत होतात.


मोठ्या कढईत किंवा खोलगट तव्यामध्ये तेल गरम करायचे. गॅस मोठा ठेउन त्यावर चिरलेले आल-लसूण टाकून थोड परतून लगेच कांदा टाकायचा.



परतून सिमला मिरची टाका.


आता ती थोडी परतून त्यात थोडे थोडे चारही सॉस टाका.


मोठ्या गॅसवर भराभर परतवून त्यावर इडली तुकडे घाला व चांगले एकजीव होईपर्यंत परतवा. वरून थोडेसे मिठ घाला. गॅस बंद करा. झाली इडली चिली.


टिपा :
जास्त तेलाचा वापर टाळायचा असेल तर इडलीचे तुकडे फ्राय न करताच टाका.
ह्यात अजून कोबी, कांद्याची पात व तुमच्या आयडीया नुसार भाज्या घालू शकता.

Friday, 7 December 2018

पनिर फ्रँकी



मुलच काय पण मोठेही रोज तेच तेच चपाती आणि भात खाऊन कंटाळतात. आहो करणार्‍यालाही रोज रोज तेच करायचा कंटाळा येतच असतो पण नाईलाज असतो बरेचदा. कारण नविन पदार्थ करायचा म्हटल की सामानाची जुळवा जुळव, तयारी करावी लागते. मग इच्छा असून पण सामान किंवा वेळ नसल्यामुळे कधी कधी ठरवलेले मनातले बेतच रद्द करावे लागतात. असो तर काय झाल त्या दिवशी असाच मुलिंना कंटाळा आला रोजच्या जेवणाचा मग म्हणाल्या आज काहीतरी वेगळ कर. आता काय वेगळ म्हटल की पहिला मी पुस्तकं काढून बसायचे पण आता घेतला मोबाईल आणि युट्युबवर सर्च केल पोटभरीचेच म्हणजे जेवणासारखे कोणते पदार्थ करता येतील ते. तेव्हा चपात्यांमध्ये सजावट करुन भरलेल्या फ्रँकी दिसल्या. खरतर आपल्याच कडची आतली भाजी आणि चपाती पण फ्रँकी बोललं की कस विदेशी पदार्थ वाटतो. मग ठरवल आज फ्रँकी करू. थोड सामान बाजारातून आणल आणि खाली दिलेल्या रेसिपी प्रमाणे केली फ्रँकी.

मला साहित्य लागल ते म्हणजे


मेन म्हणजे चपाती. त्या आपल्या सगळ्यांकडेच होतात त्यामुळे मी त्याबद्दल मी काही देत नाही. फक्त जर तुम्हाला जास्तच मऊ वगैरे हव्या असतील तर थोडा मैदा मिसळायचा. पण मी मैदा टाळते त्यामुळे नेहमी सारख्याच चपात्या केल्या.

अमुल बटर
चाट मसाला
चिज
मेयॉनिज
गुंडाळण्यासाठी अ‍ॅल्यूमिनियम फॉईल

आतील कटलेटसाठीचे सामान


१ वाटी वाफवलेले मटार
२-३ मोठे बटाटे उकडून मॅश करुन
वाटीभर होईल अस कुस्करून पनीर
हिंग
हळद
मिरची पुड १ चमचा
१ चमचा गरम मसाला (आवडत असल्यास)
तेल
गरजे नुसार मिठ

काही सजावटीसाठी भाज्या


कोबी
गाजर
सिमला मिरची (मी तीन रंगाच्या घेतल्या आहेत. लाल, पिवळी आणि हिरवी)
कांदा
कोबी
ह्या सगळ्या भाज्या लांबट कापुन घ्यायच्या.

पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर हिंग, हळद टाकून मटार टाका. परतवुन मिरची पावडर व गरम मसाला घाला ते परतवल की पनीर आणि मॅश केलेला बटाटा घाला. मिठ घाला एक वाफ आल्यावर गॅस बंद करा.


हे मिश्रण थोड थंड झाल की त्याचे लांबट कटलेट बनवा.


हे कटलेट पॅनमध्ये थोड्या तेलावर शॅलो फ्राय करुन घ्या.


सजावटीच्या भाज्या एका पॅनमध्ये थोड्या तेलावर परतवा. त्यात चाट मसाला टाका. पण शिजवायच्या नाहीत. कडक राहिल्या पाहिजेत.


पहिला चपाती थोडी शेकवून चपातीला बटर लावून घ्या.


आता त्यावर मेयॉनिज पसरवा.


मध्यभागी सजावटीच्या भाज्या उभ्या लावायच्या आणि त्यावर कटलेट ठेवून त्यावर चिज किसून पसरवायच. वरून थोडा चाट मसाला भुरभुरवायचा


मग चपातीची जी बाजू बेस करणार आहोत ती आधी दुमडायची मग त्यावर बाजूच्या दोन बाजू दुमडायच्या.


गुंडाळून झाल की खाली अ‍ॅल्युमिनीयम फॉईल गुंडाळायची झाली तुमची फ्रॅ़ंकी तय्यार.


कशी दिसतेय?


उचला आता पटापट.